DC vs GT | शेवटच्या चेंडूवर गुजरातचा डंका! Salman Ali
स्पोर्ट्स

DC vs GT | शेवटच्या चेंडूवर गुजरातचा डंका!

शुभमनचा 70 धावांचा झंझावात; बटलर, वॉशिंग्टन यांचीही अर्धशतके : मिलरचा संघर्ष व्यर्थ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढवल्या गेलेल्या ‘आयपीएल’ साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या एका धावेने निसटता विजय मिळवला. के. एल. राहुलने 52 चेंडूंत 92 धावांची झंझावाती खेळी साकारल्यानंतर डेव्हिड मिलरने 20 चेंडूंत नाबाद 41 धावा फटकावल्या. मात्र, यानंतरही त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. गुजरातने 4 बाद 210 धावांचा डोंगर रचल्यानंतर दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 209 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी शेवटच्या 2 षटकांत 36 धावांची आवश्यकता असताना मिलरने सिराजचा चांगलाच समाचार घेतला. यामुळे गुजरातने या षटकात तब्बल 23 धावा वसूल केल्या. मात्र, प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंत केवळ 2 धावा आवश्यक असताना हाच मिलर संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

दिल्लीने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर गुजरातने या लढतीत जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार शुभमन गिलने 45 चेंडूंत सर्वाधिक 70 धावा चोपल्या, तर बटलर व वॉशिंग्टन सुंदर यांनीही शानदार अर्धशतके फटकावली. बटलरने 27 चेंडूंत 52, तर वॉशिंग्टन सुंदरने 32 चेंडूंत 55 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत मुकेश कुमारने 2 बळी घेतले असले, तरी यासाठी त्याला 4 षटकांत 55 धावा मोजाव्या लागल्या. एन्गिडी व कुलदीप यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

मिलरने ती धाव घेतली असती तर!

शेवटच्या 2 चेंडूंत 2 धावा आवश्यक असताना मिलरने पाचवा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फटकावला, त्यावेळी 1 धाव घेणे सहज शक्य होते. मात्र, यामुळे शेवटच्या चेंडूवर 1 धाव आवश्यक असताना स्ट्राईक कुलदीपकडे गेली असती. तो धोका टाळण्यासाठी मिलरने पाचव्या चेंडूवर एकेरी धाव नाकारत शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देण्यास पसंती दिली. मात्र, प्रत्यक्षात शेवटचा चेंडू टोलवता न आल्याने त्याचे ते मनसुबे धुळीस मिळाले आणि येथेच दिल्लीचे विजयाचे इरादेदेखील उद्ध्वस्त झाले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT