DC vs GT Match Highlights: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल चुरशीचा सामना झाला. पण हा सामना मैदानावर दिसलेल्या एका भावनिक क्षणामुळेही चर्चेत आला. दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित असताना, शेवटच्या काही क्षणांमध्ये खेळ पलटला आणि गुजरातने अवघ्या 1 धावांनी सामना जिंकला.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 210 धावांचा मोठा स्कोर उभारला. त्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात दमदार झाली. केएल राहुलने शानदार 92 धावा करत डाव सांभाळला, तर पथुम निसांकाने 41 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र मधल्या फळीत विकेट्स झपाट्याने पडू लागल्या आणि सामना पुन्हा गुजरातच्या बाजूने झुकताना दिसला.
या परिस्थितीत डेव्हिड मिलर मैदानावर ठाम उभा राहिला. त्याने केवळ 20 चेंडूंमध्ये 41 धावांची आक्रमक खेळी करत दिल्लीला पुन्हा विजयाच्या उंबरठ्यावर आणले. शेवटच्या दोन षटकांत समीकरण खूपच रोमांचक झाले होते.
19व्या षटकात 23 धावा आल्याने दिल्लीच्या आशा अधिकच वाढल्या. अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. काही चेंडूंमध्ये सामना पूर्णपणे दिल्लीच्या बाजूने झुकला होता. एका टप्प्यावर फक्त 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज होती.
शेवटी मिलरने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा नीट संपर्क झाला नाही. त्या चेंडूवर सहज एक धाव मिळू शकली असती, पण तो धावला नाही. जर तो धावला असता, तर सामना बरोबरीत झाला असता. पुढच्या चेंडूवरही तो चूकला आणि समोरचा खेळाडू रनआऊट झाला. परिणामी, दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 1 धावांनी सामना गमावला.
हा पराभव जितका अनपेक्षित होता, तितकाच तो भावनिकही होता. सामना संपल्यानंतर मिलर पूर्णपणे खचलेला दिसत होता. अशा वेळी दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल त्याच्याकडे गेला. त्याने मिलरला मिठी मारत त्याला धीर दिला.
हा क्षण खूप काही सांगून गेला. स्पर्धेपेक्षा टीम स्पिरिट मोठं असतं, हे अक्षर पटेलने दाखवून दिलं. तो मिलरला सांगत होता "तू चांगली लढत दिलीस." हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी अक्षरच्या या कृतीचे जोरदार कौतुक केले आहे.