सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यावर मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी (ड्रंक अँड ड्रायव्हिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडनीमधील मारौब्रा येथे एका 'रँडम ब्रीथ टेस्ट'दरम्यान (श्वसन चाचणी) पोलिसांनी त्याला थांबवले असता ही कारवाई करण्यात आली.
'news.com.au' ने दिलेल्या वृत्तानुसार, ३९ वर्षीय वॉर्नरने तपासणी नाक्यावर पोहोचण्यापूर्वीच आपली कार थांबवून पार्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या वाहनापाशी जाऊन त्याची रँडम ब्रीथ टेस्ट घेतली. या चाचणीत तो मद्याच्या नशेत असल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ वॉर्नरला ताब्यात घेऊन मारौब्रा पोलीस ठाण्यात नेले, जिथे त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.१०४ इतके नोंदवण्यात आले. याप्रकरणी त्याला पुढील महिन्यात न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
वॉर्नर सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ मध्ये 'कराची किंग्स'चे नेतृत्व करत आहे. स्पर्धेतील सामन्यांमध्ये काही दिवसांची विश्रांती असल्याने तो काही काळासाठी ऑस्ट्रेलियाला परतला होता. या घटनेनंतर तो पुन्हा पाकिस्तानात रवाना झाला असला, तरी सुनावणीसाठी त्याला पुन्हा ऑस्ट्रेलिया गाठावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महान सलामीवीरांपैकी एक असलेल्या वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, तो 'बिग बॅश लीग'सह (BBL) जगभरातील विविध फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये सक्रिय आहे.
नुकत्याच पार पडलेल्या हंगामात वॉर्नरने 'सिडनी थंडर'साठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली असली, तरी वॉर्नरने ८ सामन्यांत ४३३ धावा कुटल्या. विशेष म्हणजे, त्याच्या खालोखाल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजापेक्षा वॉर्नरच्या धावा २०१ ने जास्त होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील अधिकृत 'टीम ऑफ द टूर्नामेंट'चा कर्णधार म्हणून गौरवण्यात आले.
वॉर्नरने आगामी बीबीएल हंगामासाठी पुन्हा एकदा सिडनी थंडरशी करार केला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "गेले वर्ष आमच्यासाठी आव्हानात्मक होते, पण चाहत्यांच्या अफाट पाठिंब्यामुळे मी या संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक असून संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी सज्ज आहे."
डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी ११२ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ११० टी-२० सामने खेळले असून, तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १५,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २०१६ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली 'सनरायझर्स हैदराबाद'ने आयपीएलचे (IPL) जेतेपद पटकावले होते.
सध्या वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सचा संघ पीएसएलमध्ये सलग तीन विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. गुरुवारी, ९ एप्रिल रोजी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर त्यांचा सामना पेशावर झल्मीशी होणार आहे.