पुढारी ऑनलाईन डेस्क : David Miller Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिका संघावर न्यूझीलंडने 50 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यातील पराभवानंतर आफ्रिकन संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरने एक अतिशय धक्कादायक विधान केले आहे, ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे आयसीसीवर निशाणा साधला आहे.
खरं तर, उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, द. आफ्रिकेचा संघ कराचीमध्ये शेवटचा गट सामना खेळल्यानंतर थेट दुबईला रवाना झाला. त्यानंतर पुन्हा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी तेथून लाहोरला गेला. आता उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर मिलरने याबाबत एक विधान केले आहे.
पत्रकार परिषदेत वेळापत्रकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिलर म्हणाला की, 2 मार्च रोजीचा भारत-न्यूझीलंड हा सामन्याच्या दिवशी आम्ही संध्याकळी 4 वाजता दुबईत पोहचलो. पण सामन्यानंतर आम्हाला पुन्हा दुबईतून लाहोराला जावे लागले. दुस-या दिवशी सकाळी 7.30 वाजता आमची फ्लाईट होती. आमचा हवाई प्रवास फक्त 1 तास 30 मिनिटांचा होता, पण आम्हाला प्रवास करावा लागलाच ना. जे अजिबात योग्य नव्हते. आम्ही 5 तासांचा हवाई प्रवास केला आणि आम्हाला विश्रांतीसाठी वेळ मिळाला नाही असे नाही, पण ही परिस्थिती अजिबात आदर्श नव्हती,’ असे त्याने सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवली जात आहे, ज्यामध्ये टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. तर इतर संघांचे सामने पाकिस्तानात पार पडले. दुसरीकडे, स्पर्धेतील शेवटच्या गट फेरीच्या सामन्यापर्यंत हे स्पष्ट नव्हते की भारत कोणत्या संघाविरुद्ध उपांत्य फेरी खेळेल. अशा परिस्थितीत, ग्रुप बी मधील अव्वल संघ द. आफ्रिका आणि दुस-या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया या संघांना पाकिस्तानहून दुबईला जावे लागले. पण भारताच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर, द. आफ्रिला संघ पुन्हा पाकिस्तानात गेला. न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा उपांत्य सामना लाहोर येथे खेळला गेला.
आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. त्याबाबत मिलरनेही एक विधान केले, ज्यामध्ये त्याने किवी संघाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. मिलर म्हणाला की, ‘दोन्ही संघ उत्कृष्ट आहेत. भारतीय संघ सध्या खूप चांगला खेळत आहे. या संघात अनेक मॅच विनर खेळाडूंचा समावेश आहेत. न्यूझीलंड संघातही असेच काहीसे दिसून येते. हा एक उत्तम सामना होण्याची अपेक्षा आहे.’
बुधवारी (5 मार्च) झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या उपांत्य सामन्यात आफ्रिकन संघाला न्यूझीलंडने 50 धावांनी मात दिली. हाय स्कोरींग झालेल्या या सामन्यात किवी संघाने प्रथम फलंदाजी करत द. आफ्रिकेला 363 धावांचे आव्हान दिले. मात्र, द. आफ्रिकेचा संघ 312 धावांपर्यंत मजल मारू शकला. या दरम्यान, डेव्हिड मिलरच्या फलंदाजीतून एक लढाऊ खेळी दिसून आली. मिलरने 67 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी साकारली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक ठरले. एकंदरीत द. आफ्रिकेच्या संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.