Commonwealth Games 2026 Pudhari
स्पोर्ट्स

commonwealth games 2026 : उद्घाटनाआधीच धमाका! भारताचे पहिले पदक निश्चित! ; जाणून घ्या कसं घडलं हे 'सरप्राइज'!

ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिचे किमान कांस्य पदक पक्के

पुढारी वृत्तसेवा

Commonwealth Games 2026 : ग्लासगो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) च्या औपचारिक उद्घाटनापूर्वीच भारताने आपल्या पदक तालिकेचे खाते उघडले आहे. ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टियुद्धपटू लव्हलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिने महिलांच्या बॉक्सिंग प्रकारात भारतासाठी किमान 'कांस्यपदक' निश्चित केले आहे.

रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच भारताचे पदक पक्के!

आसामच्या लव्हलिनाला महिलांच्या ७५ किलो वजनी गटात 'बाय' (Bye) मिळाल्यामुळे तिने थेट उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते. त्यामुळे लव्हलिनाला रिंगमध्ये एकही पंच न मारता थेट पदक (पोडियम फिनिश) निश्चित करण्यात यश आले आहे.लव्हलिना ३१ जुलै रोजी सुवर्णपदकाकडे पाऊल टाकण्यासाठी रिंगमध्ये उतरेल. उपांत्य फेरीच्या या लढतीत तिचा सामना टी.के.बी.पी. ताफाकी यांच्याशी होणार आहे.

आज सायंकाळी भव्य उद्घाटन

स्पर्धेचा बिगुल वाजण्याआधीच मिळालेल्या या पदकामुळे १२४ सदस्यीय भारतीय पथकाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. यंदाच्या आवृत्तीत क्रीडा प्रकारांमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली असली, तरी भारतीय खेळाडू राष्ट्रकुलमधील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहेत.भारताच्या मोहिमेची सुरुवात गुरुवारी दोन 'लॉन बॉल्स' सामन्यांनी झाली असून, आजच सायंकाळी भव्य उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.

नीरज चोप्रा आणि मीराबाई चानूकडे लक्ष!

ॲथलेटिक्सच्या स्पर्धा २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान खेळवल्या जाणार आहेत. यात मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे ऑलिम्पिक चॅम्पियन आणि विद्यमान विश्वविजेता नीरज चोप्रा. दुखापतीमुळे बर्मिंगहॅम २०२२ स्पर्धेला मुकलेला नीरज, २०१८ मधील आपले सुवर्णपदक पुन्हा मिळवण्यासाठी मैदानावर उतरेल.दुसरीकडे, वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आणि दोन वेळची राष्ट्रकुल सुवर्णविजेती मीराबाई चानू भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार असून तिच्याकडूनही सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'या' क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंचा लागणार कस

  • भारताचे खेळाडू एकूण आठ मुख्य आणि पाच 'पॅरा' क्रीडा प्रकारांत कौशल्य पणाला लावणार आहेत:

  • मुख्य खेळ: ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, ज्युडो, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग, बॉल्स आणि जलतरण.

  • पॅरा क्रीडा प्रकार: पॅरा-ॲथलेटिक्स, पॅरा-पॉवरलिफ्टिंग, पॅरा-जलतरण, पॅरा-ट्रॅक सायकलिंग आणि ३x३ व्हीलचेअर बास्केटबॉल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT