Cristiano Ronaldo Retirement: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट लवकर होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. रोनाल्डोची बहीण कातिया अवेइरो हिने 2026 चा फिफा विश्वचषक हा रोनाल्डोचा अखेरचा असू शकतो, असे संकेत दिले आहेत. तिने या स्पर्धेला त्याचा "लास्ट डान्स" असे संबोधले आहे. मात्र, रोनाल्डोकडून किंवा पोर्तुगाल फुटबॉल संघाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कातिया अवेइरो म्हणाली, "माझ्या माहितीनुसार, आता चाहत्यांनी रोनाल्डोला निरोप देण्याची तयारी ठेवावी. 2026 चा विश्वचषक हा त्याचा शेवटचा असू शकतो." या वक्तव्यानंतर रोनाल्डोच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.
क्रोएशियाविरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यात रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत पोर्तुगालला 2-1 असा विजय मिळवून दिला. या गोलासह 41 वर्षे 147 दिवसांच्या वयात विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. याआधीचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर होता. विशेष म्हणजे, सहा विश्वचषक खेळूनही हा रोनाल्डोचा पहिलाच नॉकआउट फेरीतील गोल ठरला.
क्रोएशियाविरुद्ध मैदानात उतरताच रोनाल्डोने आणखी एक विक्रम केला. विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात खेळणारा सर्वात वयस्कर आउटफिल्ड खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली.
या सामन्यात क्रोएशियाचा अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिच देखील खेळत होता. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघांकडून 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आउटफिल्ड खेळाडू एकाच सामन्यात मैदानात उतरले.
स्पर्धेच्या सुरुवातीला रोनाल्डोची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. डीआर काँगोविरुद्ध तो एकही शॉट मारू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र त्यानंतर त्याने उज्बेकिस्तानविरुद्ध दोन गोल झळकावले आणि क्रोएशियाविरुद्ध निर्णायक गोल करून टीकाकारांना उत्तर दिले.
रोनाल्डोने आतापर्यंत पोर्तुगालसाठी 232 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 146 गोल केले आहेत. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम आहे.
जर कातिया अवेइरो यांचा दावा खरा ठरला, तर 2026 च्या फिफा विश्वचषकानंतर फुटबॉल इतिहासातील एका महान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होईल. मात्र तोपर्यंत रोनाल्डो आणखी किती विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.