रियाध : पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डोने 2026 चा फिफा विश्वचषक हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक असेल, यावर शिक्कामोर्तब केले आहे. क्लब आणि देश अशा दोन्ही स्तरांवर 953 गोल करणाऱ्या या 40 वर्षीय दिग्गज खेळाडूने आपण पुढील ‘एक किंवा दोन वर्षांत’ फुटबॉलमधून पूर्णपणे निवृत्त होऊ, असेही जाहीर केले आहे.
कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्समध्ये होणारा पुढील वर्षाचा विश्वचषक रोनाल्डोसाठी सहावा विश्वचषक असेल. याच माध्यमातून, या सर्वोच्च व्यासपीठावरुन आपण निवृत्त होत असल्याचे रोनाल्डोने जाहीर केले. रियाध येथे आयोजित ‘टूरिझ समिट’मध्ये एका मुलाखतीदरम्यान, 2026 चा विश्वचषक तुमचा अखेरचा असेल का, असे विचारले असता रोनाल्डो म्हणाला, निश्चितपणे, होय. मी तेव्हा 41 वर्षांचा असेन आणि मला वाटते की ही एका मोठ्या स्पर्धेतील निवृत्तीची योग्य वेळ असेल.
सौदी अरेबियात ‘अल-नासर’ क्लबकडून खेळणारा रोनाल्डो, 143 आंतरराष्ट्रीय गोलांसह पुरुषांमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे आणि तो आपल्या कारकिर्दीतील 1000 गोलचा टप्पा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.
‘मँचेस्टर युनायटेड’, ‘रियल माद्रिद’ आणि ‘युव्हेंटस’चा माजी खेळाडू असलेल्या रोनाल्डोने गेल्या आठवड्यात आपण ‘लवकरच’ निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्याने याबाबत आणखी स्पष्टोक्ती देत आपण वर्ष, दोन वर्षाच्या कालावधीत निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले. रोनाल्डोने पोर्तुगालला युरो 2016 चे विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली.
मात्र, पाच वेळा बॅलन डी’ओर विजेत्या रोनाल्डोच्या कॅबिनेटमध्ये अद्याप वर्ल्डकपचा समावेश नाही. ही कसर आता शेवटच्या प्रयत्नात भरुन काढण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. पोर्तुगालचा संघ या स्पर्धेसाठी अद्याप पात्र ठरलेला नसला तरी रिपब्लिक ऑफ आयर्लंडला हरवून ते आपले स्थान निश्चित करतील, अशी अपेक्षा आहे.