पणजी : अल-नासर हा सौदी अरेबियाचा प्रमुख क्लब संघ एफसी गोवा विरुद्धच्या एएफसी चॅम्पियन्स लीग 2 मधील सामन्यासाठी भारतात दाखल होत आहे. मात्र, संघाचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी संघासमवेत येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
सौदी अरेबियातील ‘अल रियाधिया’ या क्रीडा वृत्तपत्रानुसार, एफसी गोवा व्यवस्थापनाने अनेकदा विनंती करूनही 40 वर्षीय रोनाल्डो या दौऱ्याचा भाग असणार नाही. अल-फतेह संघावर लीगमध्ये सहज विजय मिळवल्यानंतर, अल-नासर संघ या खंडांतर्गत स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळवला जाईल.
एफसी गोवाने एएफसी कपचे माजी विजेते ‘अल सीब’ संघाचा पराभव करून एएफसी चॅम्पियन्स लीग 2 साठी पात्रता मिळवली होती. त्यानंतर या स्पर्धेच्या ‘ड’ गटात त्यांना रोनाल्डोच्या अल-नासर संघासोबत स्थान मिळाले. अल-नासर संघाचे आगमन दाभोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होईल.
पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक असलेला रोनाल्डो, आपला कार्यभार सांभाळण्यावर आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. शिवाय, अल-नासरने रोनाल्डोच्या अनुपस्थितीतही आशियाई एएफसी चॅम्पियन्स लीग 2 मधील गट-साखळीतील दोन्ही सामने जिंकले आहेत आणि ते पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी सुस्थितीत आहेत. एफसी गोवा विरुद्धच्या सामन्यानंतर, अल-नासर संघ 28 ऑक्टोबर रोजी ‘किंग्स कप’च्या 16 संघांच्या फेरीतील सामन्यात प्रतिस्पर्धी अल इत्तिहाद संघाविरुद्ध खेळेल.
अल-नासर आणि इंडियन सुपर लीगमधील क्लब एफसी गोवा एकाच गटात आल्याने, हा पोर्तुगीज सुपरस्टार एका स्पर्धात्मक सामन्यासाठी भारतात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अल-नासरसोबतच्या त्याच्या करारामध्ये एक असे कलम आहे, जे त्याला सौदी अरेबियाबाहेरील सामने निवडण्याचे स्वातंत्र्य देते.