Cristiano Ronaldo file photo
स्पोर्ट्स

Cristiano Ronaldo: रोनाल्डो २१ नंबरची जर्सी घालून का खेळला? पोर्तुगालच्या विजयानंतर मैदानावरच ढसाढसा रडला

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सामना संपल्यानंतर मैदानातच भावूक झाला आणि बाहेर पडताना त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 Cristiano Ronaldo Portugal vs Croatia

पोर्तुगाल : फिफा विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी रात्री पोर्तुगालने क्रोएशियाचा २-१ असा पराभव करत रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, हा विजय पोर्तुगालसाठी केवळ पुढच्या फेरीत जाण्याचा आनंद देणारा ठरला नाही, तर एका दिवंगत सहकाऱ्याच्या आठवणीने संपूर्ण संघ भावूक झाला. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सामना संपल्यानंतर मैदानातच भावूक झाला आणि बाहेर पडताना त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

या विशेष सामन्यात रोनाल्डोने त्याची जगप्रसिद्ध '७ नंबर'ची जर्सी बाजूला ठेवून, आपला दिवंगत सहकारी डियोगो जोटा याची '२१ नंबर'ची जर्सी परिधान करून मैदानात उतरला होता. पोर्तुगालच्या संपूर्ण संघाने जोटा याला अनोखी श्रद्धांजली वाहिली. ३ जुलै २०२६ रोजी जोटाच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्याने या ठवणींना उजाळा देण्यात आला.

कार अपघातात झाले होते जोटाचे निधन

लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्व्हा यांचा ३ जुलै २०२५ रोजी स्पेनमध्ये एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतर हा अपघात झाला होता. जोटाने त्याची मैत्रीण रुटे कार्डोसो हिच्याशी विवाह केला होता, मात्र नियतीने हा आनंद फार काळ टिकू दिला नाही.

पोर्तुगाल अजूनही विसरला नाही आपला 'स्टार'

डियोगो जोटा हा पोर्तुगालच्या सर्वात विश्वासू फॉरवर्ड खेळाडूंपैकी एक होता. त्याने राष्ट्रीय संघासाठी ४९ सामन्यांत १४ गोल केले होते. गंडोमारमधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जोटाने पाकोस डी फेरेरा, पोर्टो, वोल्व्हरहॅम्प्टन वांडरर्स आणि लिव्हरपूलपर्यंतचा प्रवास स्वबळावर गाजवला होता. "तुम्ही सगळे सोबत आहात, तर सर्व काही शक्य आहे. धन्यवाद, पोर्तुगाल" आपल्या मृत्यूच्या महिनाभर आधी नेशन्स लीगच्या विजेतेपदानंतर जोटाने केलेली ही सोशल मीडिया पोस्ट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

क्रोएशियाचा पहिला वार, VAR मुळे सामन्याला कलाटणी

सामन्याची सुरुवात पोर्तुगालसाठी सोपी नव्हती. दुसऱ्या सत्रात ५३ व्या मिनिटाला इव्हान पेरिइच याने गोल करत क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यामुळे पोर्तुगालवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचे सावट निर्माण झाले होते. मात्र, ६८ व्या मिनिटाला व्हीएआरच्या मदतीने पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यात कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

स्टॉपेज टाईममध्ये रोमहर्षक विजय

सामना अतिरिक्त वेळेकडे झुकत असतानाच, स्टॉपेज टाईमच्या चौथ्या मिनिटाला राफेल लियाओच्या उत्कृष्ट क्रॉसवर गोन्कालो रामोसने शानदार हेडर मारत गोल केला. या गोलमुळे पोर्तुगालने २-१ अशी अटीतटीची आघाडी घेतली. त्यानंतर काही वेळातच क्रोएशियाने गोल करत बरोबरी साधली होती, मात्र व्हीएआर तपासणीत जोस्को ग्वार्डिओल ऑफसाइड असल्याचे स्पष्ट झाले आणि क्रोएशियाचा तो गोल रद्द करण्यात आला.

आता स्पेनशी थेट लढत

या थरारक विजयासह पोर्तुगालने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आता सोमवारी डलास स्टेडियमवर पोर्तुगालचा सामना बलाढ्य स्पेनशी होईल. हा सामना या विश्वचषकातील सर्वात मोठा आणि अटीतटीचा मुकाबला ठरेल अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT