स्पोर्ट्स

Cristiano Ronaldo Red Card : पोर्तुगालच्या रोनाल्डोला 22 वर्षांत प्रथमच रेड कार्ड

225 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिलेच रेड कार्ड, विश्वचषकातील सलामी लढतीतही खेळण्याची शक्यता अंधूक

रणजित गायकवाड

डबलिन : पोर्तुगालचा दीर्घकाळचा तारणहार ख्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या 22 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीत प्रथमच रेड कार्डला सामोरे जावे लागले. फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीतील सामन्यात आयर्लंडच्या बचावपटू दारा ओ‌’शेला कोपर मारल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. आता रविवारी अर्मेनियाविरुद्ध होणाऱ्या पुढील पात्रता लढतीत 40 वर्षांच्या रोनाल्डोला पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही, असे चित्र आहे.

डबलिन येथे झालेल्या आयर्लंड विरुद्ध पोर्तुगाल या गट ‌‘ऋ‌’ पात्रता सामन्यात रोनाल्डोने गोलानंतर फिरताना उजव्या हाताचा कोपर ओ‌’शेच्या पाठीवर मारला. रेफ्रीनी याची गांभीर्याने दखल घेत रोनाल्डोला लगेचच रेड कार्ड दाखवले आणि पुढे व्हिडीओ रेफरलनंतर देखील हा निर्णय कायम ठेवण्यात आला.

मैदानाबाहेर जाताना रोनाल्डोने आक्षेपार्ह हातवारे केले. आयर्लंडच्या प्रेक्षकांकडून होणाऱ्या चिडवण्यावर तो थांबून टाळ्या व दोन अंगठे उंचावून उपरोधिक प्रतिक्रिया देताना दिसला. आश्चर्य म्हणजे या सामन्यात आयर्लंडने 2-0 असा आश्चर्यकारक विजय नोंदवला.

रोनाल्डोला आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कारकिर्दीत 225 व्या सामन्यात पहिल्यांदाच रेड कार्ड मिळाले आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत हा 12 वा रेड कार्ड आहे. मागील रेड कार्ड त्याला गेल्या वर्षी अल नासरसाठी अल हिलालविरुद्ध मिळाले होते. येत्या रविवारी पोर्तुगालचा अर्मेनियाविरुद्ध पुढील लढत होत असून येथे विजय मिळवल्यास पोर्तुगालचा संघ विश्चषकासाठी पात्र ठरणार आहे. आगामी विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहे.

रोनाल्डोसाठी आगामी विश्चषक स्पर्धा शेवटची

आपण सहाव्या विश्वचषकात खेळणार असून त्यानंतर निवृत्त होत असल्याचे रोनाल्डोने यापूर्वीच जाहीर केले आहे. या विश्वचषकाचा ड्रॉ 5 डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी येथे होणार आहे. सध्या पात्रता फेरीत ‌‘फ‌’ गटात पोर्तुगाल 10 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. हा संघ हंगेरीपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे तर आयर्लंड 7 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

फिफाचे नियम काय सांगतात?

  • फिफाच्या शिस्तभंग नियमांनुसार गंभीर फाऊल प्लेसाठी किमान 2 सामन्यांची बंदी

  • हिंसक वर्तनासाठी किमान तीन सामन्यांची बंदी

  • कोपर मारणे असॉल्ट मध्ये मोडत असल्याने किमान 3 सामने किंवा कालावधीप्रमाणे बंदी लागू शकते.

ही बंदी फक्त स्पर्धात्मक सामन्यांना लागू होते. सराव-मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये ती भरून निघत नाही. यामुळे पोर्तुगाल पात्र ठरल्यास रोनाल्डो विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याच्या धोक्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT