Cricketer IPL Star Rinku Singh MP Priya Saroj wedding date
भारताची स्फोटक फलंदाज रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज लग्न करणार आहेत. दोघांच्याही लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. रिंकू आणि प्रिया सरोज यांची 18 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली जाणार असून त्याआधी 8 जून रोजी या जोडप्याचा साखरपुडा पार पडणार आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.
लखनौमधील एका हॉटेलमध्ये सारखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. रिंकू आणि प्रिया सरोज या दोघांच्याही कुटुंबियांनी आयपीएल लक्षात घेऊन रिंग साखरपुड्याची तारीख निश्चित केली. खरंतर रिंकू गेल्या काही महिन्यांपासून आयपीएल 2025 मध्ये व्यस्त होता. आयपीएलचा विजेतेपदाचा सामना 3 जून रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार होता, परंतु रिंकूचा कोलकाता नाईट रायडर्स संघ लीग टप्प्यातूनच बाहेर पडला. त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. या हंगामात त्याने 13 सामन्यांच्या 11 डावात 153.73 च्या स्ट्राइक रेटने आणि 29.42 च्या सरासरीने 206 धावा केल्या.
रिंकू सिंहची भावी जीवनसाथी प्रिया सरोज ही समाजवादी पक्षाची खासदार आहे. तिने वयाच्या 26 व्या वर्षी मच्छलीशहर मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. तिने बीपी सरोज यांचा 35850 मतांनी पराभव केला. ती पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आली आहे. सध्या ती सर्वात तरुण खासदार आहे. प्रियाचा जन्म 23 नोव्हेंबर 1998 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. तिने तिचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून बीए पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने नोएडा येथे कायद्याचे शिक्षण घेतले. तिने सर्वोच्च न्यायालयातही वकिलीची प्रॅक्टीस केली आहे. प्रिया सरोजने 2024 मध्ये राजकारणात प्रवेश केला.