स्पोर्ट्स

Cricketer Fraud : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ : बाबर-रिझवानसह शाहिन शाह आफ्रिदीची कोट्यवधीची फसवणूक

पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडू मोठ्या पाँझी स्कीम घोटाळ्याचे बळी

रणजित गायकवाड

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यांच्यासह पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडू एका मोठ्या पाँझी स्कीम घोटाळ्याचे बळी ठरले आहेत. या फसवणुकीत खेळाडूंचे कोट्यवधी रुपये बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानच्या सुमारे डझनभर खेळाडूंनी एका पाकिस्तानी व्यावसायिकाकडे मोठी रक्कम गुंतवली होती. सुरुवातीला या व्यावसायिकाने खेळाडूंना काही महिने नफा दिला. मात्र, नंतर पैसे देणे बंद केले. जेव्हा खेळाडूंनी त्याच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्याने ‌‘व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे‌’ असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणात फसवणूक झालेल्यांत पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी, फखर जमान, शादाब खान यांच्यासह एका माजी कसोटी कर्णधाराचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी फरार

संबंधित व्यावसायिक पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मधील काही फ्रँचायझींना प्रायोजित करण्यातही सहभागी होता, त्यामुळे खेळाडूंचा त्याच्यावर विश्वास बसला होता. मात्र, फसवणूक उघडकीस आल्यानंतर त्याने खेळाडूंचे फोन उचलणे बंद केले असून, तो देश सोडून पळून गेल्याचे समजते.

दरम्यान, या आर्थिक घोटाळ्याची दखल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली असून, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. खेळाडूंच्या मैदानाबाहेरील या आर्थिक व्यवहारांमुळे ‌‘पीसीबी‌’च्या अडचणीत वाढ झाली आहे.

1000 कोटींहून अधिकचा फटका?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेळाडूंनी केवळ स्वतःचीच नाही, तर त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रांचीही रक्कम या योजनेत गुंतवली होती. एकूण गुंतवणुकीचा आकडा 100 कोटी पाकिस्तानी रुपयांहून (1 अब्ज) अधिक असण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT