विराट कोहली आणि सरफराज खान Twitter
स्पोर्ट्स

कोहलीला शतकाची हुलकावणी, टीम इंडिया 125 धावांनी पिछाडीवर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरू येथे खेळली जाणारी पहिली कसोटी रंजक बनली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावातील अपयश विसरून आपल्या दुस-या डावात दमदार पुनरागमन केले आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने रचिन रवींद्रच्या शतकाच्या (134) बळावर 402 धावा केल्या. यानंतर, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या. सध्या भारतीय संघ 125 धावांनी पिछाडीवर आहे.

न्यूझीलंडची मोठी धावसंख्या

कालच्या 3 बाद 180 च्या पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडने आज सामन्याच्या तिस-या दिवशी 233 धावांवर 7 विकेट गमावल्या. डॅरिल मिशेल (18), टॉम ब्लंडेल (5), ग्लेन फिलिप्स (14) आणि मॅट हेन्री (8) हे स्वस्तात बाद झाले. मात्र. यानंतर रवींद्र आणि टीम साऊदी (65) यांनी आठव्या विकेटसाठी 137 धावांची मोठी भागीदारी रचली. किवींनी 402 धावा करून पहिल्या डावाच्या जोरावर 356 धावांची भक्कम आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने 3-3 बळी घेतले.

रचिन रवींद्रचे भारताविरुद्ध पहिले कसोटी शतक

रचिन रवींद्रने 157 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 134 धावांची खेळी केली. 2012 नंतर भारतीय भूमीवर शतक झळकावणारा तो पहिला किवी फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 12 वर्षांपूर्वी रॉस टेलरने भारतीय संघाविरुद्ध बेंगळुरूमध्येच शतक झळकावले होते. रचिनचे हे आशियातील पहिले शतक आहे.

दुसऱ्या डावात भारताची उत्कृष्ट फलंदाजी

दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. जैस्वालच्या (35) रूपाने भारताला पहिला धक्का बसला. यानंतर कर्णधार रोहित 52 धावा करून 95 धावांवर बाद झाला. यानंतर सरफराज खान आणि विराट कोहली यांनी जबाबदारी स्वीकारली आणि भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर 70 धावा करून कोहली बाद झाला.

सरफराज खानचा संघर्ष

सरफराजने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. 78 चेंडूत 70 धावा केल्यानंतर तो क्रीजवर नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

कोहलीच्या 9 हजार कसोटी धावा पूर्ण

कोहलीने त्याच्या कसोटी करिअरमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने दुसऱ्या डावात 53वी धावा करताना हा आकडा गाठला. तो 9,000 कसोटी धावा करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (15,921) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर राहुल द्रविड (13,265) आणि सुनील गावस्कर (10,122) यांचा क्रमांक लागतो. जगातील सक्रिय खेळाडूंपैकी फक्त इंग्लंडचा जो रूट (12,716) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (9,685) यांनी कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT