पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ Pune Test : पुणे कसोटीत न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात 156 धावांत गुंडाळल्यानंतर आता किवी संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात वेगाने धावा करणे सुरू केले असून त्यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली आहे. ग्लेन फिलिप्स (9*) आणि टॉम ब्लंडेल (30*) क्रीजवर आहेत. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी 301 धावांची झाली आहे.
पहिल्या डावात 15 धावा करून बाद झालेल्या टॉम लॅथमने दुसऱ्या डावात कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 133 चेंडूंचा सामना करत 86 धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या 14 धावांनी हुकले. त्याच्या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. विल यंगने 23 धावांचे योगदान दिले. त्याला रविचंद्रन अश्विनने एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा रचिन रवींद्र दुसऱ्या डावात फ्लॉप झाला. त्याला केवळ 9 धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला आपला बळी बनवले. डॅरिल मिशेल 23 चेंडूत 18 धावा बाद झाला. न्यूझीलंडच्या अजूनही पाच विकेट शिल्लक आहेत. ज्यामुळे शनिवारी सामन्याच्या तिस-या दिवशी ते आघाडी 400 धावांच्या पुढे नेतील, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे टीम इंडियाला सामना गमावण्याचा धोका वाढला आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 विकेट घेणारा वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी करत आहे. किवी फलंदाजांना अडचणीत आणणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. सुंदरने आतापर्यंत दुसऱ्या डावात 4 बळी घेतले आहेत. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना अद्याप विकेट घेता आलेली नाही. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे उर्वरित पाच विकेट लवकरात लवकर मिळवण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.