पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे टॉप खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (1 एप्रिल) 2025-26 साठी त्यांची सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली. यात त्यांनी महत्त्वाचे बदल केले आहेत. यादीत तीन नवीन खेळाडूंना समाविष्ट केले आहे. तर तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या यादीत पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यासांरख्या दिग्गजांसह एकूण 23 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. (Cricket Australia Central Contract)
यादीत युवा फलंदाज सॅम कॉन्स्टस, अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर आणि फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिघा खेळाडूंनी भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत लक्षवेधी कामगिरी केली होती. ज्याचे त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून बक्षिस मिळाले आहे.
कॉन्स्टसने आपल्या कसोटी कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात केली. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना केला होता. तसेच पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 60 धावा फटकावल्या होत्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवण्यास मदत झाली. तर 31 वर्षीय ब्यू वेबस्टरनेही याच मालिकेत पदार्पण केले आणि शानदार अर्धशतक झळकावले. गोलंदाजीत त्याने मिचेल मार्शपेक्षा जास्त षटके फेकली. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली, जिथे त्याने आपल्या ऑफ-स्पिनच्या जोरावर 2 बळी घेतले. त्याने आतापर्यंत 3 कसोटी सामन्यांमध्ये 150 धावा केल्या असून 3 बळी मिळवले आहेत.
2022 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणा-या मॅट कुहनेमनला पहिल्यांदाच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश मिळाला आहे. या खेळाडूने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 5 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 25 विकेट्स घेतल्या असून एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या खात्यात 6 विकेट्स जमा झाल्या आहेत. यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार प्रदर्शन करून दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 16 बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तो नॅथन लायनचा उत्कृष्ट जोडीदार ठरला आहे. मात्र, काही काळ त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, पण आता त्याला क्लीन चिट मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘मॅथ्यू कुहनेमनने श्रीलंकेत शानदार प्रदर्शन केले आणि आम्हाला विश्वास आहे की तो आगामी 18 महिन्यांत महत्त्वाची भूमिका निभावेल. ब्यू वेबस्टरने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. तो संघाच्या समतोलाला बळकटी देतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याच्याकडे उत्कृष्ट पर्याय म्हणून पाहिले जात आहे.’
पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टस, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर अॅडम झांपा, झेवियर बार्टलेट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी आणि झाई रिचर्डसन.
सीन अॅबॉट, आरोन हार्डी आणि टॉड मर्फी यांना कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे. ते गेल्या काही काळात अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत. मर्फीला श्रीलंकेत एक कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती, पण नव्या यादीतून त्याला बाहेर करण्यात आले आहे.
टॉप ऑर्डर फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगर्क यालाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत स्थान मिळालेले नाही, जे थोडे आश्चर्यकारक ठरले आहे. त्याने 2024-25 कालावधीत 5 वनडे आणि 7 टी20 सामने खेळले होते. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट करण्यात आले होते. पण या स्पर्धेच्या एकाही सामन्यात त्याला खेळवण्यात आले नाही.
गेल्या वर्षी चांगली कामगिरी केलेल्या युवा अष्टपैलू कूपर कॉनॉली यालाही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने दुर्लक्षित केले आहे. कॉनॉलीला कराराच्या यादीत स्थान न मिळणे थोडे अनपेक्षित आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या मागील कसोटी आणि वनडे संघाचा भाग होता. गेल्या वर्षी त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र, तरीही त्याला यादीतून वगळण्यात आले आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या तीन कसोटींमध्ये खेळला नाथन मॅकस्वीनी देखील कराराच्या यादीतून गायब झाला आहे. तर टी-20 तज्ञ मार्कस स्टोइनिस आणि टिम डेविड यांनाही करार यादीतून डच्चू मिळाला आहे.