स्पोर्ट्स

Commonwealth Games 2026 : नीरज चोप्रा दुसऱ्या सुवर्णपदकासाठी सज्ज, ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम-पाथिरागेचे तगडे आव्हान

neeraj chopra vs arshad nadeem : ॲथलेटिक्‍स इव्‍हेंटसना सोमवारपासून सुरुवात

रणजित गायकवाड

ग्लासगो : येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या ॲथलेटिक्स प्रकारात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या सुवर्णपदकावर निशाणा साधणार आहे. गेल्या बर्मिंगहॅम स्पर्धेतील ८ पदकांचा (१ सुवर्ण, ४ रौप्य, ३ कांस्य) विक्रम मोडीत काढण्याचा निर्धार ३२ सदस्यीय भारतीय संघाने केला आहे.

जागतिक स्तरावरील तगड्या आव्हानामुळे नीरजची लढत अत्यंत चुरशीची ठरेल. त्याच्यासमोर ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम (पाकिस्तान) आणि या हंगामात ९२.६२ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रुमेश पाथिरागे (श्रीलंका) यांचे मुख्य आव्हान असेल. पाथिरागे सध्या फॉर्मात असून त्याने दोन डायमंड लीग जेतेपदे पटकावली आहेत.

दुसरीकडे, नीरजने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये कसून सराव केला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. भारताचे रोहित यादव (हंगामातील सर्वोत्तम: ८७.०५ मी.) आणि यशवीर सिंग हे देखील मैदानात असतील. ३० जुलै रोजी पात्रता फेरी, तर ३१ जुलै रोजी अंतिम फेरी रंगणार आहे.

अन्‍य इव्‍हेंटसमध्‍येही भारताला बर्‍याच अपेक्षा

भालाफेकीव्यतिरिक्त भारताला इतर प्रकारांतही पदकांच्या मोठ्या आशा आहेत. लांब उडीत बर्मिंगहॅमचा रौप्यपदक विजेता मुरली श्रीशंकर (८.३८ मी.) आणि लोकेश सत्यनाथन पदकांचे प्रमुख दावेदार आहेत. उंच उडीत २.३१ मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवणारा सर्वेश कुशाळे पहिल्याच दिवशी (सोमवारी) भारताचे पदक खाते उघडू शकतो. त्याला आदर्श राम आणि तेजस्विन शंकर यांची साथ लाभेल.

तेजस्विन शंकर डेकॅथलॉनमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करत असून, तो पदकाचा प्रबळ दावेदार आहे. ट्रिपल जंपमध्ये प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू, तर ट्रॅक इव्हेंटमध्ये १०० मीटर हर्डल्समध्ये तेजस शिरसे भारताला पोडियमवर पोहोचवू शकतात. या इव्‍हेंटमध्‍ये पहिल्याच दिवशी सर्वेश कुशाळे, तेजस शिरसे, मुरली श्रीशंकर आणि धावपटू गुरिंदरवीर सिंग मैदानात उतरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT