Chris Gayle Punjab Kings Video :
कधीकाळी टी२० क्रिकेटमधला दादा खेळाडू म्हणून मिरवणारा ख्रिस गेल देखील डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत ख्रिस गेलने आयपीएल, पंजाब किंग्ज आणि डिप्रेशनबाबत मोठे खुलासे केले आहेत. ख्रिस गेलने २०१८ ते २०२१ दरम्यान आयपीएलचा संघ पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केलं होतं. पंजाब किंग्जसोबत खेळत असताना गेलने ४१ सामन्यात ४०.७५ च्या सरासरीने १ हजार ३०४ धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट हा १४८.६५ इतका होता.
द युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने नुकतेच मोठे खुलासे केले आहेत. त्यानं पंजाब किंग्ज सोबत खेळत असताना काय घडलं हे सगळं सांगून टाकलंय. तो म्हणाला की, माझा पंजाब किंग्जमध्ये अपमान झाला. या काळात त्याला आपण डिप्रेशनमध्ये चाललो आहे असं वाटू लागलं होतं.
ख्रिस गेल शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'माझी आयपीएल कारकीर्द पंजाब किंग्जमध्ये वेळेआधीच संपली. माझा पंजाब किंग्जमध्ये अपमान झाला. मला वाटतं की एक वरिष्ठ खेळाडू म्हणून पंजाबमध्ये मला चांगली वागणूक मिळाली नाही. मी या लीगसाठी खूप काही दिलं होतं. अन् या लीगची किंमत वाढवण्यात माझाही मोठा वाटा होता. मात्र मला एका छोट्या मुलाप्रमाणं वागवलं गेलं.'
ख्रिस गेल पुढं म्हणाला, 'आयुष्यात पहिल्यांदाच मला मी डिप्रेशनमध्ये जातोय असं वाटलं. मी उद्ध्वस्त झालो होतो. मी अनिल कुंबळेशी देखील याबाबत बोललो. मला खूप वेदना झाल्या होत्या. मात्र माझी त्याच्याकडून आणि फ्रेंचायजी ज्या पद्धतीनं रन केली जात होती ते पाहून निराशा झाली.'
ख्रिस गेलनं त्यावेळेचा पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलबाबत देखील वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'केएल राहुलनं देखील मला फोन केला आणि म्हणाला की, ख्रिस तू थांब तू पुढचा समना खेळणार आहेस. मात्र मी त्याला तुला शुभेच्छा एवढंच म्हणालो.'
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये अनेक फ्रेंचायजींचं प्रतिनिधित्व केलं. तो कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगुळूरू या फ्रेंचायजींकडून खेळला होता. मात्र त्यानं सर्वाधिक धावा या पंजाब किंग्जकडून खेळताना केल्या होत्या. त्यामुळं त्याचा या संघासोबत एक भावनिक बंध निर्माण होणं सहाजिक आहे.