पुढारी ऑनलाईन डेस्क : कसोटी क्रिकेटमध्ये सध्याच्या काळात भक्कम बचावात्मक आणि चिवट फलंदाजी करणारा फलंदाज कोण?, या प्रश्नाच्या उत्तरात चेतश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हेच नाव प्रथम येते. तो मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने आपल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची स्वंतत्र ओळख निर्माण केली आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला त्याचबरोबर पराभवाच्या उबंरठ्यावर असणार्या सामने ड्रॉ करण्यातही त्याची खेळी महत्त्वपूर्ण ठरली आहे. अशाच खेळीचे स्मरण करुन त्याने आज (दि.२१) पुन्हा एकदा करुन दिले. रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या फेरीत छत्तीसगडविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावले आहे.
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत छत्तीसगडविरुद्ध शतक झळकावले. त्याने १९७ चेंडूचा सामना केला. छत्तीसगडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ५७८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात सौराष्ट्र संघाने 81 धावांत 2 गडी गमावले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पुजाराने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण शतक झळकावले. त्याचे हे रणजी ट्रॉफीतील २५ वे शतक आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील ६६ वे शतक आहे. या शतकासह पुजाराने ब्रायन लाराला मागे टाकत इतिहास रचला आहे. लाराने प्रथम श्रेणीत ६५ शतके झळकावली होती.
चेतेश्वर पुजाराने छत्तीसगडविरुद्ध शतक झळकावण्यासोबतच प्रथम श्रेणीत २१ हजार धावाही पूर्ण केल्या. या कामगिरीमुळे तो आता प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत सुनील गावस्कर अग्रस्थानी असून, त्याच्या नावावर एकूण 25834 धावा आहेत. सचिन तेंडुलकर 25396 धावांसह दुसऱ्या तर राहुल द्रविड 23784 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पुजारा या यादीत चौथ्या स्थानावर आहे, ज्याने ५० च्या सरासरीने २१ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीतील सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत सुनील गावस्कर आणि सचिन ८१ शतकांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. द्रविड ६८ शतकांसह दुसऱ्या तर पुजारा ६६ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
चेतेश्वर पुजारा सुमारे दीड वर्षापेक्षा अधिक काळ टीम इंडियातून बाहेर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता.या सामन्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले अहो. या वर्षी त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी १६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६ शतके झळकावली आहेत. रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमातही पुजाराने ८ सामन्यात ६९ च्या सरासरीने ८२९ धावा केल्या होत्या.
चेतेश्वर पुजारा याचे वडील अरविंद पुजारा आणि काका बिपिन पुजारा हे दोघेही सौराष्ट्रचे रणजी ट्रॉफी खेळाडू होते. चेतेश्वर पुजाराने डिसेंबर २००५ मध्ये सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. पुजाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळूरु कसोटीतून झाली. तेव्हापासून तो भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य भाग बनला. १०० हून अधिक कसोटी सामन्यात पुरजाराने ४३.६० च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.