चेन्नईच्या विजयाने कोलकाताची वाट बिकट Swapan Mahapatra
स्पोर्ट्स

KKR vs CSK : चेन्नईच्या विजयाने कोलकाताची वाट बिकट

सहाव्या क्रमांकावर कायम : प्ले ऑफची आशा अंधूक

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : बुधवारी (7 मे) इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 2 विकेटस्ने पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताला पराभूत करत अखेर तिसर्‍या विजयाची नोंद केली आहे. चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपले आहे; पण त्यांच्या विजयामुळे आता कोलकाताची वाट बिकट झाली आहे. ‘केकेआर’ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचे 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त 15 गुण मिळवण्याची संधी आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर कोलकाताला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

या सामन्यात कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 19.4 षटकांत 8 विकेटस् गमावत 183 धावा करत पूर्ण केला. या सामन्यात चेन्नईकडून आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉनवे ही नवीन सलामी जोडी मैदानात उतरली होती; पण दुसर्‍याच चेंडूवर आयुषला वैभव अरोराने शून्यावर माघारी धाडले. तर दुसर्‍या षटकात कॉनवेला मोईन अलीने शून्यावर त्रिफळाचीत केले; पण तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उर्विल पटेलने पहिल्या षटकापासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याचाही अडथळा तिसर्‍या षटकात हर्षित राणाने दूर केला. उर्विलने 11 चेंडूंत 1 चौकार आणि 4 षटकारांसह 31 धावा केल्या.

आर. अश्विन 8 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाही 10 चेंडूंत 19 धावा करून त्रिफळाचीत झाला. त्यामुळे पॉवरप्लेच्या 6 षटकांतच चेन्नईने 60 धावांवर 6 विकेटस् गमावल्या होत्या; पण नंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांची जोडी जमली. दुबेने एक बाजू सांभाळली असताना ब्रेव्हिसने आक्रमण केले. त्याने वादळी फटके मारताना अर्धशतक केले; पण अर्धशतकानंतर त्याला 13 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने रिंकू सिंगच्या हातून झेलबाद केले. त्याने 25 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. त्यानंतर दुबेने जबाबदारी खांद्यावर घेतली. मात्र, चेन्नई विजयाच्या जवळ असताना शिवम दुबे 19 व्या षटकात 40 चेंडूंत 45 धावा करून बाद झाला. याच षटकात नूर अहमदही 2 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 8 धावांची गरज होती. यावेळी एम. एस. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकात ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अंशुल कंबोजने चेन्नईसाठी विजयी चौकार मारला.

तत्पूर्वी, कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 179 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणने 33 चेंडूंत सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. आंद्रे रसेलने 38 धावांची खेळी केली. मनिष पांडेने नाबाद 36 धावा केल्या, तर सुनील नारायणने 26 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकांत 6 बाद 179 धावा. (अजिंक्य रहाणे 48, आंद्रे रसेल 38. नूर अहमद 4/31)

चेन्नई सुपर किंग्ज : 19.4 षटकांत 8 बाद 183 धावा. (डेवॉल्ड ब्रेव्हिस 52, शिवम दुबे 45. वरुण चक्रवर्ती 2/18)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT