चेन्नई : फिरकीपटू युजवेंद्र चहलने एकाच षटकात हॅट्ट्रिकसह 4 बळी घेतल्यानंतर पंजाब सुपर किंग्जने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एकतफीर्र् धुव्वा उडवला. शिवाय, त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आणले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकांत सर्वबाद 190 धावांपर्यंत मजल मारली तर प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 19.4 षटकांत 6 बाद 194 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 191 धावांचे आव्हान असताना कर्णधार श्रेयस अय्यर (41 चेंडूंत 72) व प्रभसिमरन सिंग (36 चेंडूंत 54) यांनी दुसर्या गड्यासाठी 72 धावांची भरभक्कम भागीदारी साकारली आणि इथेच पंजाबच्या विजयाचा पाया रचला गेला. मधल्या फळीत बरीच पडझड झाली असली तरी अंतिमत: पंजाबने शेवटच्या षटकात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. चेन्नईतर्फे खलील अहमद व पथिराणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा स्टार गोलंदाज चहलने या लढतीतील 19 व्या षटकात तळाचे तीन फलंदाज ओळीने गारद करत शानदार हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने चौथ्या चेंडूवर दीपक हुडा, पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोज तर शेवटच्या चेंडूवर नूर अहमदला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. याच षटकातील दुसर्या चेंडूवर त्याने धोनीला बाद केले होते. चेन्नईतर्फे सॅम कुरेनने सर्वाधिक 88 धावांचे योगदान दिले. चहलने 32 धावांत 4 बळी, असे पृथक्करण नोंदवले. आयपीएलमधील ही त्याची दुसरी हॅट्ट्रिक ठरली.
चहल हा पंजाब किंग्जकडून हॅट्ट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी युवराज सिंगने पंजाबकडून दोनदा अशी कामगिरी केली होती. अक्षर पटेल आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
अमित मिश्रा : 3 वेळा (2008, 2011, 2013)
युवराज सिंग : 2 वेळा (2009)
युजवेंद्र चहल : 2 वेळा (2022, 2025)
पंजाब किंग्जकडून हॅट्ट्रिक
युवराज सिंग : 2
अक्षर पटेल : 1
सॅम कुरेन : 1
युजवेंद्र चहल : 1
चेन्नई सुपर किंग्ज : 19.2 षटकांत सर्वबाद 190. (सॅम कुरेन 47 चेंडूंत 88, ब्रेव्हिस 32. चहल 3 षटकांत 4-32. अर्शदीप, मार्को प्रत्येकी 2 बळी).
पंजाब किंग्ज : 19.4 षटकांत 6 बाद 194. (श्रेयस अय्यर 41 चेंडूंत 72, प्रभसिमरन सिंग 54, शशांक सिंग 23. खलील, पथिराणा प्रत्येकी 2 बळी).