भारताने आपला चॅम्पियन्स ट्रॉफीमधला बांगला देशविरुद्धचा पहिला सामना 6 गडी राखून जिंकला. ही हेडलाईन वाचायला छान वाटते, पण क्रिकेट हा नुसताच आकडेवारीचा खेळ नाही. क्रिकेटची आकडेवारीबद्दल एक प्रख्यात वाक्य आहे ते म्हणजे आकडेवारी ही बिकिनीसारखी असते. जे दिसते ते प्रेक्षणीय असेल, पण जे दिसत नाही ते जास्त महत्त्वाचे असते. बांगला देशविरुद्धच्या सामन्याची आकडेवारी या उक्तीचे समर्थन करायला पुरेशी आहे. कुठचाही सामना 6 गडी राखून जिंकला म्हणजे दणदणीत विजय म्हटला पाहिजे, पण हा विजय समाधान देणारा नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे आपण बांगला देशला सामन्यात परतायची संधी वारंवार देत होतो. जो सामना आपण सहज जिंकायला पाहिजे होता तो आपण जिंकायला 47 षटके खर्च केली आणि काही धाकधुकीचे क्षण निर्माण केले. (Champions Trophy)
चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रत्येक संघाला तीनच सामने खेळायचे आहेत. यात तीन संघांचे गुण बरोबर व्हायची शक्यता असते आणि असे झाले तर नेट रनरेट महत्त्वाचा ठरतो. बांगला देशची अवस्था 5 बाद 35 असताना आपण सामन्यावरची पकड राखू शकलो नाही. बांगला देशला शंभरच्या आसपास गुंडाळून या धावा आपण कमीत कमी षटकांत केल्या असत्या तर दोन फायदे झाले असते. एक म्हणजे आपला नेट रनरेट सुधारला असता. एक सामना जिंकून आज न्यूझीलंडचा नेट रनरेट 1.2 आहे, तर भारताचा रनरेट 0.408 आहे. दुसरा फायदा म्हणजे कमी लक्ष्य भारताने आक्रमकतेने गाठले असते तर पाकिस्तानच्या सामन्याआधी भारताचे मनोबल जास्त चांगले असते. मोठ्या सामन्याच्या आधी कधी कधी ही झाकली मूठ चांगली असते कारण मोठ्या सामन्याला सामोरे जाताना गरज असते ती शांत चित्ताची आणि आत्मविश्वासाची.
आपल्याला 229 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली, असे मी म्हणणार नाही, पण सामना फिरतोय की काय असे वाटणारे काही क्षण नक्कीच होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 69 धावांची सलामी जरूर दिली, पण रोहित शर्माचे सुरुवातीचे चाचपडणे अजूनही दिसले. त्याच्या 7 चौकारांत काही वेळा विंटेज रोहित शर्मा बघायला मिळाला, पण उत्तम सुरुवात झालेली असताना पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळला. शुभमन गिलची खेळी इथल्या अस्सल 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिल्यासारखी चमकदार होती. त्याच्या पहिल्या पूल च्या चौकारापासून त्यात नजाकत होती. दुबईच्या गोल्ड सुक म्हणजे सोन्याच्या बाजारात तुम्ही गेलात तर काही दागिने सोन्याचे असले तरी बटबटीत असतात आणि काही इतके सुंदर कलात्मक असतात की बघत राहावेसे वाटते. गिलचे शतक असे कलात्मक होते. दुबईची खेळपट्टी ही संथ आहे आणि चेंडू बॅटवर यायला जी वेळ लागतो त्याप्रमाणे आपली शैली बदलत त्याने बॅकफूट आणि फ्रंटफूटवर उत्तम फटके खेळले.
विराट कोहलीची फलंदाजी बघताना वारंवार एकच जाणवत आहे ते म्हणजे त्याचे उत्तम खेळी करण्याचे त्यांच्यावर असलेले मानसिक दडपण. त्याच्या क्लासबद्दल कुणीच शंका घेणार नाही, फिटनेसही त्याच्या बाजूने आहे, पण गाडे अडतंय ते मानसिक स्थितीत. जणू काही 140 कोटी लोकं त्याची प्रत्येक खेळी तपासून बघायला टपलेली आहेत. तेव्हा उत्तमच खेळले पाहिजे आणि त्यासाठी तो आपला नैसर्गिक खेळ विसरून अति सावधपणे खेळत आहे आणि त्यात त्याच्या चुका होत आहेत. गेल्या 6 एक दिवसीय सामन्यात 5 वेळा तो लेगस्पिनरला बाद झाला आहे आणि एकदा डावखुर्या फिरकीला. विराट कोहलीला चेंडू बॅटवर आलेला आवडतो, पण दुबईच्या खेळपट्ट्यांवर हे त्याला मिळणार नाही. त्याने या सामन्यात पहिली धाव घ्यायला तब्बल 8 चेंडू घेतले. शुभमन गिल जी अॅडजस्टमेंट करू शकतो ती विराट कोहलीला जमणार नाही, असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल प्रश्न आहे तो फक्त त्याच्या मानसिकतेचा. मोठे खेळाडू त्यांची उत्तम खेळी मोठ्या सामन्यासाठी राखून ठेवतात तेव्हा पाकिस्तानविरुद्ध मनमोकळा विराट बघायला मिळू दे हीच अपेक्षा.
ऋषभ पंत का राहुल हा प्रश्न आपल्याला कायम त्रास देत राहील. 4 बाद 144 असताना राहुल खेळायला आला आणि त्याने गिलच्या बरोबर आपला विजय निश्चित केला हे खरे पण त्यात जाकेर अलीने त्याला दिलेल्या जीवदानाची राहुलचा सोपा झेल टाकून केलेली परतफेड होती. हा झेल सोडला तेव्हा जिंकायला अजून 63 धावा हव्या होत्या आणि सामन्याचा निकाल पलटायची शक्यता होती. राहुलने एकंदरीत बरे यष्टिरक्षण केले तरी त्याने स्टंपिंग चुकवले. माझ्या मते ऋषभ पंतकडे जी सामना एकहाती फिरवायची ताकद आहे ती राहुलकडे नाही. पाचव्या स्थानावर निव्वळ फलंदाजीच्या गादीचा वारसदार असण्यापेक्षा जर वरचे महाराजे धारातीर्थी पडले तरी सामना खेचून आणेल, असा छावा हवा आहे आणि तो आहे ऋषभ पंत. तेव्हा ऋषभ पंत हा केव्हाही निर्विवादपणे पहिली पसंती असायला हवी.
आपल्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर शमीने पाच बळी घेत आपली छाप पाडली. आज शमीही रोहित शर्मा, कोहली, जडेजा सारखा पेन्शनीत जायच्या मार्गावर आहे. बुमराह नसताना त्याला दुसर्या बाजूने निव्वळ साथ देणारा नाही तर वेळप्रसंगी सूत्रे हाती घेणारा जलदगती गोलंदाज हवा आहे. सिराजच्या ऐवजी हर्षित राणाने निवड समितीवर आणि गंभीरच्या पाठिंब्यावर छाप पाडली असेल, पण त्याच्या गोलंदाजीत वेग सोडला तर वैविध्याचा अभाव आहे. आजकाल अष्टपैलूची व्याख्या इतकी सोपी करून टाकली आहे. राणाला आताच कपिलदेव म्हणायची काहींना घाई झाली आहे. अनुभवाच्या बाबतीत उपलब्ध खेळाडूत अर्शदीप ‘वासरात लंगडी गाय’ आहे तेव्हा त्याचा पाकिस्तानविरुद्ध विचार करायला हवा.
कुलदीप यादव आणि जडेजा या दोघांना बळी मिळाले नाहीत, पण कुलदीप यादवने जे बांगला देशी फलंदाजांना चकवले ते बघता त्याला विकेट न मिळणे हा फक्त दुर्दैवाचा भाग आहे, असे म्हणता येईल. याच कारणासाठी जरी इतिहासाच्या पानात फक्त आकडेवारी नोंदली जात असली तरी या बांगला देश विरुद्धच्या विजयात आकडेवारी पलीकडे जाऊन पुढच्या सामन्यासाठी बघणे जरुरीचे आहे. बांगला वाघाची शिकार तर आपण केली, पण गरजेपेक्षा जास्त कष्ट घेऊन असेच या विजयाबाबत म्हणावे लागेल.