पुढारी ऑनलाईन डेस्क : फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 60 धावांनी हरवून विजयाने सुरुवात केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 5 बाद 320 धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात, गतविजेत्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47.2 षटकांत 260 धावांवर ऑलआउट झाला. पाकिस्तानकडून खुशदिल शाह आणि बाबर आझम यांनी अर्धशतके झळकावली पण त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
तत्पूर्वी, विल यंग-टॉम लॅथम यांच्या शतकांच्या आणि ग्लेन फिलिप्सच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकांत पाच गडी बाद 320 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 321 आव्हानात्मक लक्ष्य आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. किवी संघाने 73 धावांत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर यंगने लॅथमसोबत चौथ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी शतके झळकावली आणि संघाला कठीण काळातून वाचवले.
यंग 113 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारासह 107 धावा काढून बाद झाला, तर टॉम लॅथम 104 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 118 धावा काढून नाबाद राहिला. यंगनंतर, लॅथमने फिलिप्ससह डावाला गती दिली. फिलिप्सनेही अर्धशतक ठोकले. त्याने 39 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 61 धावा काढल्या आणि बाद झाला. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त, न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने 10 आणि केन विल्यमसनने 1 धावेचे योगदान दिले. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर फिरकी गोलंदाज अबरार अहमदने एक विकेट घेतली.
न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर आणि विल्यम ओ'रोर्क यांनी प्रत्येकी तीन, तर मॅट हेन्रीने दोन विकेट घेतल्या. मायकेल ब्रेसवेल आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 69 धावांवर तीन विकेट गमावल्या. बाबर आझमने 90 चेंडूत 64 धावा केल्या, पण त्याचा डाव खूपच संथ होता ज्यामुळे धावगतीचा दबाव वाढला. खुशदिलने शेवटी काही फटके मारले पण 49 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. पाकिस्तानकडून बाबर आणि खुसदिल व्यतिरिक्त सलमान आघाने 24, सौद शकीलने 6, मोहम्मद रिझवानने 3, तैय्यद ताहिरए 1, शाहीन आफ्रिदीने 14, नसीम शाहने 13 आणि हरिस रौफने 19 धावा केल्या.