पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये ‘दव’ मोठी भूमिका बजावते. नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला नेहमीच विजयाची मोठी संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला त्यांचे सर्व सामने फक्त दुबईमध्ये खेळायचे आहेत. आता जर कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला तर ठीक आहे पण जर तो हरला तर काय होईल? टीम इंडिया दव फॅक्टरवर मात देऊ शकेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुबईतील बहुतेक एकदिवसीय सामने पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. त्या विजयांत दव फॅक्टर महत्त्वाचे ठरले आहे. येथे पहिला एकदिवसीय सामना 2009 मध्ये खेळला गेला. तेव्हापासून आतापर्यंत या मैदानावर 58 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यातील 34 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तर 22 सामन्यांमध्ये धावांचा बचाव करण्यात यश आले आहे. 1 एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला आहे. तर 2 सामन्यांचे निकाल लागले नाही. गेल्या 4-5 वर्षांतही चित्र बदललेले नाही. 2021 पासून दुबईमध्ये 24 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 14 वेळा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी येथे खेळल्या गेलेल्या एका सराव सामन्यात, पाठलाग करणाऱ्या संघानेच विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान शाहीनने बांगलादेशने दिलेले 203 धावांचे लक्ष्य 91 राखून आरामात गाठले.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी वर्चस्व गाजवले आहे हे स्पष्ट आहे. आकडेवारी दशकापूर्वीची असो किंवा गेल्या काही वर्षांची असो किंवा नवीनतम असो. दुबईची खेळपट्टी नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल राहिली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे दव. ज्यामुळे दुस-या डावातील गोलंदाजांना चेंडू ओला झाल्याने पकडणे आणि फेकणे अवघड होते. ज्यामुळे विरोधी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळते.
आता हे निश्चित आहे की बहुतेक सामन्यांमध्ये टॉस जिंकणा-या संघाचेच वर्चस्व असेल. पण, जर टॉस गमावला तर प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर इतक्या धावा टाकाव्यात की दव मैदानावर असूनही विरोधी संघाला लक्ष्य गाठणे सोपे जाऊ नये. भारतीय फलंदाज ही रणनिती कशी यशस्वी करतीय हे त्या-त्या सामन्यावेळी दिसेल.
दुबईच्या खेळपट्टीचा भारतीय संघाला फायदा मिळू शकतो, पण काही अडचणीसुद्धा असतील.
दुबईची खेळपट्टी हळूहळू संथ होत जाते आणि स्पिनर्सना टर्न व गती नियंत्रित करण्यास मदत मिळते. भारताकडे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती असे अनुभवी फिरकीपटू आहेत. मधल्या षटकांत फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल हे खेळाडू फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतात. संथ खेळपट्टीवर संयम राखून खेळणे गरजेचे असते आणि भारतीय फलंदाजांकडे हे करू शकतात.
भारतीय संघाने आयपीएल, आशिया कप आणि अन्य सामने या मैदानावर खेळले आहेत. संघाला येथे कशी फलंदाजी करायची आणि कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव आहे.
वेगवान गोलंदाजांसाठी फारशी मदत नाही : वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून विशेष स्विंग किंवा उसळी मिळणार नाही. संथ खेळपट्टीमुळे वेगवान गोलंदाजांना अधिक युक्त्या वापराव्या लागतील.
जर सामना रात्री झाला तर दुसऱ्या डावात दव पडू शकते, ज्यामुळे फिरकी गोलंदाजांना ग्रिप मिळणे कठीण होईल. अशा वेळी गोलंदाजी करताना संघासमोर अडचणी येऊ शकतात.
भारतीय संघासाठी दुबईची खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते, विशेषतः त्यांच्या फिरकी गोलंदाजांसाठी. मात्र, परिस्थितीनुसार संघाला योग्य रणनीती आखावी लागेल. जर पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आणि फिरकी गोलंदाजांनी योग्य रीतीने गोलंदाजी केली, तर टीम इंडिया नक्कीच विजयी होईल.