पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेने भारतात प्रेक्षकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. विशेषतः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना प्रचंड लोकप्रिय ठरला. त्या सामन्याने भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यांच्या पूर्वीच्या प्रेक्षकसंख्येचे विक्रम मोडीत काढले.
या स्पर्धेतील टीम इंडियाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह वाढला, ज्यामुळे प्रेक्षकसंख्या आणि टीव्ही रेटिंग्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. या स्पर्धेची टीव्ही रेटिंग कोणत्याही मल्टी-नेशनल क्रिकेट स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त झाली आहे. ज्यामुळे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ची विक्रमी प्रेक्षकसंख्याही मागे पडली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेपेक्षा 23% चांगली कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या थेट प्रक्षेपणाला स्टार स्पोर्ट्सवर 137 अब्ज मिनिटे आणि जिओ हॉटस्टारवर 110 अब्ज मिनिटे वेळ मिळाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या थरारक अंतिम सामन्याचा टीव्हीवर 12.2 कोटी आणि जिओ हॉटस्टारवर 6.1 कोटी प्रेक्षकांनी आनंद घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याने क्रिकेटमध्ये डिजिटल प्रेक्षकसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा सामना टीव्ही इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रेटिंग असलेला वनडे सामना ठरला (ICC क्रिकेट विश्वचषक सामन्यांव्यतिरिक्त). या सामन्याचे थेट प्रक्षेपण 23 कोटी लोकांनी पाहिले, तर एकूण 53 अब्ज मिनिटे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले.
या स्पर्धेत भारतात सर्वाधिक पाहिलेला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान होता. यावेळी हा सामना टीव्हीवर 26 अब्ज मिनिटांपेक्षा जास्त काळ पाहिला गेला. तर 2023 च्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना 19.5 अब्ज मिनिटे पाहिला गेला होता. या सामन्याला 10.8% पेक्षा जास्त टेलिव्हिजन रेटिंग मिळाले.
ICC अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीने आठ वर्षांनंतर जबरदस्त पुनरागमन केले. भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याने भारतातील प्रेक्षकसंख्येने नवा उच्चांक गाठला. ही अविश्वसनीय प्रेक्षकसंख्या भारतात क्रिकेटची व्यापक लोकप्रियता दर्शवते. ICC स्पर्धांचे विविध भाषांमध्ये प्रक्षेपण केल्याने क्रिकेट चाहत्यांची संख्या आणखी वाढली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान झालेल्या रोमांचक क्रिकेटमुळेही ही लोकप्रियता वाढली आहे.’