भारताने जिंकलेल्या 4 विश्वचषक विजयातील समान दुवा म्हणजे, यातील प्रत्येक वेळी भारताने घेतलेले सामन्याला कलाटणी देणारे अप्रतिम झेल. 1983, 2007, 2024 व आता 2025 अशा चारही विश्वचषक विजयातील कलाटणी देणाऱ्या अप्रतिम झेलांचा हा अनोखा योगायोग!
भारताचा डाव अवघ्या 183 धावांवर संपुष्टात आल्यानंतर विंडीजचा व्हिव्ह रिचर्डस् अक्षरश: तुटून पडत होता. याच जोशात रिचर्डस्ने मदन लालच्या गोलंदाजीवर आक्रमक फूल फटका मारला, जो मिड-विकेट सीमारेषेकडे उंच उडाला. कपिल देवने यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता वेगाने मागे धाव घेत खांद्यावरून मागे पाहत अप्रतिम झेल टिपला, रिचर्डस् बाद झाला आणि सामन्यालाच कलाटणी मिळाली, भारताने विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली.
2007 साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि मिसबाह-उल-हक फलंदाजी करत होता. मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर स्कूप फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उंच उडाला आणि षटकार तर नव्हे ना, या चिंतेने सर्वांच्या काळजात अक्षरश: धस्स झाले; पण भारताच्या सुदैवाने चेंडू आवाक्यात होता. शॉर्ट फाईन-लेगवर तैनात श्रीशांतने चेंडूवर लक्ष केंद्रित करत अप्रतिम झेल टिपला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले!
आणखी एक तणावपूर्ण सामना, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. हार्दिक पंड्याने डेव्हिड मिलरला एक वाईड फूल टॉस चेंडू टाकला, जो त्याने लाँग-ऑफ सीमारेषेकडे जोरात टोलवला. चेंडू सीमेपलीकडे जाणार, अशीच भीती होती. मात्र, सीमारेषेवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने धावत जाऊन सीमारेषेपासून काही इंच अंतरावर अप्रतिम झेल घेतला आणि सामन्याला येथेच कलाटणी मिळाली. भारताने अंतिमत: 7 धावांनी विजय संपादन केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉरा वोल्वार्डने धडाकेबाज शतक झळकावत भारताच्या गोटात अक्षरश: खळबळ उडवून दिली होती. वोल्वार्ड आणखी एक मोठे आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याने सामन्याचे पारडे अजूनही दोलायमान होते. याच प्रयत्नात वोल्वार्डकडून दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात नकळत चूक झाली, ज्यामुळे चेंडू डीप मिड-विकेट सीमारेषेकडे गेला. अमनज्योत कौर धावत पुढे आली, अनेक वेळा हातातून निसटूनही तिसऱ्या प्रयत्नात डाव्या हाताने तिने झेल पूर्ण केला आणि इथेच सामन्याला मोठी कलाटणी मिळाली. वोल्वार्ड बाद झाल्याने दिलासा मिळाला आणि पुढे भारताने आपले पहिले महिला विश्वचषक विजेतेपद पटकावले. कौरने या झेलाचे वर्णन माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण झेल असे केले.