US Open 2025 | कार्लोस अल्काराझचा धडाका! अमेरिकन ओपन जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल Pudhari File Photo
स्पोर्ट्स

US Open 2025 | कार्लोस अल्काराझचा धडाका! अमेरिकन ओपन जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल

जॅनिक सिन्नरवर चार सेटस्मध्ये मात

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : जवळपास पावणेतीन तास चाललेल्या एकतर्फी फायनलमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझने इटलीच्या जॅनिक सिन्नरचा चार सेटसमध्ये धुव्वा उडवत अमेरिकन टेनिस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. पूर्ण स्पर्धेत बहरात असलेल्या अल्काराझने निर्णायक फायनलमध्येही आपला धडाका कायम राखला. त्याने सर्व्हिसवरील आपली हुकूमत अधोरेखित करताना सिन्नरचे आव्हान मोडीत काढले. तसेच, जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचे स्थानदेखील काबीज केले.

‘बिग थ्री’च्या (फेडेरर, नदाल, जोकोव्हिच) सुवर्णकाळाची उणीव जाणवू द्यायचा नाही, या ईर्ष्येने जणू खेळणार्‍या अल्काराझ व सिन्नर यांच्यात या लढतीत बराच संघर्ष झाला. गेल्या दोन वर्षांत झालेल्या आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा या दोन्ही मातब्बरांनी समसमान प्रमाणात वाटून घेतल्याचे चित्र असून, येथे अल्काराझची जादू अधिक प्रभावी ठरली. अल्काराझने एसवर अगदी थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले. या संपूर्ण स्पर्धेत त्याने स्वप्नवत सर्व्हिंग केली. सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा मानकरी असलेल्या अल्काराझने त्यानंतर आपली खास ‘गोल्फ-स्विंग’ विजय मुद्रा सादर केली.

यावर्षी या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या मागील दोन ग्रँडस्लॅम फायनलच्या तुलनेत, म्हणजेच फ्रेंच ओपनमधील पाच तास 29 मिनिटांचा मॅरेथॉन सामना आणि लंडनमध्ये झालेला रोमांचक सामन्याच्या तुलनेत टेनिसप्रेमींच्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाही. आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये रोमांचक सामन्याची अपेक्षा होती; पण याच्या उलट हा एकतर्फी सामना ठरला. दोन तास 42 मिनिटांत अल्काराझने सिनरला 6-2, 3-6, 6-1, 6-4 ने हरवून त्याच्यावर वर्चस्व गाजवले.

आपले दुसरे यूएस ओपन विजेतेपद मिळवून अल्काराझने तिन्ही सरफेसवर एकापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकणार्‍या दिग्गजांच्या विशेष यादीत स्थान मिळवले आहे. त्याच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये फक्त ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद वगळता, आता इतर तीनही प्रमुख स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन विजेतेपदे आहेत.

सिन्नरचा संघर्ष संपुष्टात

यादरम्यान, सिन्नरची हार्ड-कोर्ट ग्रँड स्लॅममधील 27 सामन्यांची विजयी मालिका येथे संपुष्टात आली. 2008 नंतर रॉजर फेडररने यूएस ओपनचे विजेतेपद राखले होते, त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरण्याची संधी त्याने गमावली. दुसर्‍या सेटमधील थोडासा संघर्ष वगळता, अल्काराझने अतिशय दर्जेदार खेळ साकारला. सिन्नरची सर्व्हिस इथे अपेक्षेप्रमाणे बहरली नाही, याचाही त्याला फटका बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT