टेनिसपटू कार्लोस अल्काराझ Pudhari File Photo
स्पोर्ट्स

French Open final 2025| साडेपाच तासांच्या मॅरेथॉन लढतीत अल्काराझचा रोमांचक विजय!

दोन सेटस्ची पिछाडी भरून काढत सिनरला नमवले; 21 व्या वर्षी पाचवे ग्रँडस्लॅम

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : तब्बल साडेपाच तासांच्या रोलर कोस्टर लढतीत यशापयशाचे पारडे दोन्ही बाजूंनी झुकत असताना मॅरेथॉन लढतीत स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने अव्वल मानांकित इटलीच्या जॅनिक सिनरला निर्णायक पाचव्या सेटमधील टायब्रेकरमध्ये पराभवाचा धक्का दिला आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे ग्रँडस्लॅमवर अगदी थाटात आपले नाव कोरले. या निमित्ताने टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत एका ऐतिहासिक आणि अविश्वसनीय फायनल्सचे क्रीडा विश्व साक्षीदार ठरले. श्वास रोखून धरणार्‍या लढतीत अल्काराझने दोन सेटस्ची पिछाडी भरून काढत, तसेच तीन चॅम्पियनशिप पॉईंटस् वाचवत 4-6, 6-7 (4), 6-4, 7-6 (3), 7-6 (10-2) असा सनसनाटी विजय मिळवला.

कोर्ट फिलिप-चॅट्रियरवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्याची सुरुवात सिनरच्या आक्रमक खेळाने झाली. त्याने पहिले दोन सेटस् जिंकत अल्काराझवर प्रचंड दडपण आणले. पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर दुसर्‍या सेट टायब्रेकमध्ये 7-6(4) अशी बाजी मारत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. यावेळी अल्काराझ पराभवाच्या छायेत दिसत होता. मात्र, 21 वर्षीय अल्काराझने हार न मानता तिसर्‍या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने तिसरा सेट 6-4 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान जिवंत ठेवले. चौथा सेट आणखी चुरशीचा ठरला. सिनर 5-3 अशा आघाडीवर असताना त्याच्याकडे तीन चॅम्पियनशिप पॉईंटस् होते. परंतु, अल्काराझने हे तिन्ही पॉईंटस् वाचवत सिनरची सर्व्हिस भेदली आणि सामना टायब्रेकमध्ये नेला. हा टायब्रेक 7-6 (3) असा जिंकत त्याने सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली.

निर्णायक पाचव्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. अखेरीस हा सेटही चॅम्पियनशिप टायब्रेकमध्ये गेला, जिथे अल्काराझने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबत 7-0 अशी आघाडी घेतली आणि अखेरीस 10-2 असा सहज विजय मिळवला. विजयी गुण मिळवताच त्याने क्ले कोर्टवर लोटांगण घालत आनंद साजरा केला. हे अल्काराझचे 21 व्या वर्षी पटकावलेले पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद असून, तो आजपर्यंत खेळलेल्या पाचही ग्रँड स्लॅम फायनलमध्ये अपराजित राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT