Wimbledon 2024 men's singles final
विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात गतविजेता स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्‍कराझने बाजी मारली.  File Photo
स्पोर्ट्स

कार्लोस अल्कराझच विम्बल्डनचा 'किंग'

नंदू लटके

टेनिसविश्‍वातील सर्वात प्रतिष्‍ठित मानल्‍या जाणार्‍या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात गतविजेता स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्‍कराझने बाजी मारली. त्‍याने गत उपविजेत्‍या नोव्‍हाक जोकोविच याचा ६-२, ६-२, ७-६ (४) असा सलग तीन सेटमध्‍ये पराभव करत सलग दुसर्‍या वर्षी विम्‍बल्‍डन ग्रॅण्डस्लॅमवरील आपलं नाव कायम ठेवलं. या पराभवामुळे सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू जोकोविच याचे ऐतिहासिक रौप्‍यमहोत्‍सवी (२५) ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाला गवसणी घालण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले.

पहिल्‍याच सेटमध्‍ये जोकोविच निष्प्रभ

मागील वर्षी प्रमाणे यंदाही विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅमच्‍या अंतिम सामन्‍यात अल्‍कराझ आणि जोकोविच यांनी धडक मारली होती. त्‍यामुळे या लढतीकडे अवघ्‍या टेनिसविश्‍वाचे लक्ष वेधले होते.जोकोविचची पहिलीच सर्व्हिस भेदत पहिल्‍या सेटमध्‍ये अल्‍कराझने आघाडी घेतली. यानंतर आपली सर्व्हिस कायम राखली. तसेच जोकोविचच्‍या चुका हेरत त्‍याच्‍या तीन सर्व्हिस मोडित काढत अल्‍कराझने पहिला सेट ६-२असा आपल्‍या नावावर केला.

दुसर्‍या सेटमध्‍येही अल्‍कराझचेच वर्चस्‍व

जोकोविचची सर्व्हिस भेदत दुसर्‍या सेटमध्‍ये अल्‍कराझने आघाडी कायम ठेवली. यानंतर उत्‍कृष्‍ट सर्व्हिसचे प्रदर्शन करत जोकोविचला कमबॅकची संधीच दिली नाही. नॅटजवळील फटके मारताना केलेल्‍या चुका जोकोविचला चांगल्‍याच महागात पडल्‍या. दुसर्‍या सेट ६-२ असा जिंकत अल्‍कराझने सामन्‍यात निर्णायक आघाडी घेतली.

सलग तीन सेट जिंकत सलग दुसर्‍यांदा विम्‍बल्‍डनला गवसणी

तिसर्‍या सेटमध्‍ये पहिल्‍या चार गेमध्‍ये दोघांनी आपली सर्व्हिस कायम ठेवली. अल्‍कराझ याने गतविजेता असल्‍याचे दाखवून देत तिसर्‍या सेटमधील पाचव्‍या गेममध्‍ये जोकोविचची सर्व्हिस भेदत निर्णायक आघाडी आपल्‍या नावावर केली. मात्र जाेकाेविचने अल्‍कराझची सर्व्हिस भेदत सेट ५-५ असा बराेबरीत आणला. विशेष म्‍हणजे संपूर्ण सामन्‍यात जोकोविच याने प्रथमच अल्‍कराझची सर्व्हिस ब्रेक करता आली. तिसरा सेट ६-६ असा बराेबरीत आल्‍यानंतर अखेर ट्राय ब्रेकरमध्‍ये 7-6(4)अशी बाजी मारत सलग अल्‍कराझने सलग दुसर्‍यांदा विम्‍बल्‍डनला गवसणी घातली.

दिग्गज विरुद्ध युवा टेनिसपटूंमधील लढत

अल्‍कराज २१ वर्षांचा तर जोकोविच ३७ वर्षांचा. दोघांमध्‍ये वयातील अंतर तब्‍बल १६ वर्षांचे. अशातच जोकोविच गुडघ्‍याला झालेल्‍या दुखापतीमुळे संपूर्ण सामन्‍यात बॅकफूटवर दिसला. त्‍याच्‍या हालचालींवर मर्यादा असल्‍याचे दिसले. त्‍याच्‍याकडून नकळत झालेल्‍या चुकांचा अल्‍कराझने अचूक फायदा उठवत सलग दुसर्‍यांदा विम्‍बल्‍डन ग्रॅण्‍डस्‍लॅम आपल्‍या नावावर केले.

अल्‍कराझने केली बियॉन बोर्ग, बोरीस बेकरच्‍या कामगिरीची बरोबरी

यंदा विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरी अंतिम लढतीची गेल्या वर्षीच्या लढतीची पुनरावृत्ती झाली. गत विजयता कार्लोस अल्कराझ आणि गत उपविजेत्या नोव्हाक जोकोविच हे आमने-सामने होते. मागील वर्षी विम्बल्डन अंतिम स्पर्धेत पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर अल्कराने जोकोविच वर मात करून पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. २१ वर्षीय अल्‍कराज याने कमी वयात विम्बल्डनचे दुसरे विजेतेपद मिळवून अल्कराझ याने बियॉन बोर्ग आणि बोरीस बेकर यांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे. टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्कराज सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे.

SCROLL FOR NEXT