Wimbledon 2025 | विम्बल्डनमध्ये अल्काराझ सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Wimbledon 2025 | विम्बल्डनमध्ये अल्काराझ सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये

विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम : जोकोव्हिचला नमवत सिन्नरही अंतिम लढतीत; महिला एकेरीत स्वायटेकची आगेकूच

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : स्पेनचा 22 वर्षीय युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसर्‍यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तर, दुसर्‍या उपांत्य लढतीत जॅनिक सिन्नरने जोकोव्हिचचे आव्हान संपुष्टात आणत एकच खळबळ उडवली. अवघ्या 1 तास 40 मिनिटांच्या लढतीत सिन्नरने 6-3, 6-3, 6-3 असा जोकोव्हिचचा सरळ सेटस्मध्ये फडशा उडवला. 23 वर्षीय सिन्नरने यावेळी 2023 मधील जोकोव्हिचकडूनच झालेल्या उपांत्य लढतीतील पराभवाचा हिशेबदेखील येथे चुकता केला.

* स्वायटेकविरुद्ध बेलिंडा बेन्सिकचा सरळ सेटस्मध्ये धुव्वा

* स्वायटेकची ग्रासकोर्ट ग्रँडस्लॅममध्ये प्रथमच अंतिम फेरीत धडक

तत्पूर्वी, ग्रास कोर्टवर खेळल्या गेलेल्या येथील पहिल्या उपांत्य सामन्यात अल्काराझने फ्रिट्झवर 6-4, 5-7, 6-3, 7-6 (6) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या विजयामुळे दोन वेळचा गतविजेता अल्काराझ एका विशेष यादीत सामील झाला आहे. या शतकात दिग्गज रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी असा पराक्रम गाजवला आहे.

स्वायटेक फायनलमध्ये

दरम्यान, या स्पर्धेच्या महिला एकेरीत इगा स्वायटेकने गुरुवारी सेंटर कोर्टवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ग्रास कोर्टवर तिने फायनलमध्ये धडक मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात, स्वायटेकने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकचा 6-2, 6-0 असा केवळ 1 तास 11 मिनिटांत सहज पराभव केला. या स्पर्धेपूर्वी, स्वायटेकने ऑल इंग्लंड क्लबमध्ये कधीही उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारली नव्हती किंवा कोणत्याही ग्रास-कोर्ट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती. आता, ज्या सरफेसवर तिला नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागला, तिथे आपले पहिले विजेतेपद मिळवण्यापासून ती केवळ एक विजय दूर आहे. या विजयासह, 2012 मध्ये रॅडवान्स्कानंतर विम्बल्डन महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली पोलिश खेळाडू ठरली आहे.

ग्रँडस्लॅम फायनल्समध्ये स्वायटेकची अव्वल कामगिरी

ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यांमध्ये स्वायटेक 5-0 अशी अपराजित आहे. तिने आजवर रोलँड गॅरोसवरील चार आणि 2022 यूएस ओपनचे जेतेपद काबीज केले आहे. आता आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावून आपला ग्रँड स्लॅमचा सेट पूर्ण करण्याकडे आणखी एक पाऊल टाकण्याचा तिचा प्रयत्न असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT