पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आयपीएल 2025 च्या सुरुवातीपेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. नवीन हंगामाचा पहिला सामना चेन्नईच्या होम ग्राउंड चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठ्या विजयाने सीएसकेने या सामन्यात बाजी मारली. मात्र, या सामन्यात जे काही घडले त्याने सर्वांचे लक्ष वेधले. सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मैदानामध्ये चक्क मुंबई इंडियन्सचा बॉलर दीपक चहरला बॅटने मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चेन्नईच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खेळाडू मैदानात एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्याच वेळी, एमएस धोनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशी बोलत होता. अचानक, दीपक चाहर धोनीच्या समोरून गेला आणि काहीतरी बोलला. यानंतर हसत-हसत धोनीने आपली बॅट उचलली आणि त्याच्या दिशेने फिरवली. चाहरही हसत उडी मारत बाजूला झाला. हा मजेदार क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
दीपक चाहर सात हंगामांपर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. धोनीच्या नेतृत्वाखाली तो चमकला आणि संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू ठरला. दोघांची मैत्रीही सर्वश्रुत आहे. अनेक वेळा मैदानात आणि मैदानाबाहेर दोघांचे मजेशीर किस्से पाहायला मिळाले आहेत. या वेळीही चाहरला मुंबई इंडियन्समध्ये पाहून धोनीने त्याच्यासोबत थोडा मजेशीर खेळ केला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 155 धावा केल्या. रोहित शर्मा खातेही उघडू शकला नाही. मुंबईसाठी तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर दीपक चाहरने 28 धावा फटकावल्या. चेन्नईसाठी नूर अहमदने 4 आणि खलील अहमदने 3 विकेट घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जने हा लक्ष्य 19.1 षटकांत 6 गडी राखून गाठला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 26 चेंडूंमध्ये 53 धावा फटकावत सामन्याचा आधारस्तंभ ठरला, तर रचिन रवींद्र 65 धावांवर नाबाद राहिला आणि विजयाची मोहोर उमटवली.