नवी दिल्ली : फुटबॉलच्या मैदानात एक अत्यंत रोमहर्षक इतिहास नुकताच रचला गेला आहे. आफ्रिका खंडातील एल छोटासा देश केप व्हर्डे याने त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीतील सर्वात मोठी झेप घेतली आहे. या देशाच्या संघाला त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून पहिले-वहिले फिफा विश्वचषक तिकीट मिळाले आहे. आफ्रिकन पात्रता फेरीतील निर्णायक सामन्यात केप व्हर्डेने एस्वातिनी संघाचा ३-० असा एकतर्फी पराभव केला आणि कोट्यवधी फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधले. विजयानंतर या लहानशा देशात अक्षरशः आनंदाचा महापूर उसळला.
केवळ सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या बेट राष्ट्राने विश्वचषकासारख्या फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर पात्र होणारा जगातील दुसरा सर्वात लहान देश होण्याचा अविश्वसनीय मान पटकावला आहे. यापूर्वी, २०१८ च्या रशिया विश्वचषकात खेळलेला आईसलँड हाच एकमेव देश आहे, ज्याची लोकसंख्या केप व्हर्डेपेक्षा कमी आहे. साधनसंपत्ती आणि लोकसंख्या कमी असतानाही, केवळ जिद्द, मेहनत आणि खेळाप्रतीचे निस्सीम प्रेम या बळावर त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे, हे विशेष.
सामन्यात केप व्हर्डे आणि एस्वातिनी या दोन्ही संघांमध्ये सुरुवातीला कमालीची चुरस दिसून आली. पहिल्या सत्रात गोल करण्यासाठी दोन्ही संघांना यश आले नाही, त्यामुळे सामन्यात डेडलॉकची स्थिती कायम राहिली. मात्र, दुसऱ्या सत्रात केप व्हर्डेच्या खेळाडूंनी सामन्याची सूत्रे पूर्णपणे हाती घेतली. अवघ्या तीन मिनिटांच्या आत डायलॉन लिव्हरामेंटो याने पहिला गोल करून हा डेडलॉक तोडला आणि संघाला बहुप्रतिक्षित आघाडी मिळवून दिली. या गोलने संपूर्ण संघात उत्साह संचारला.
पहिला गोल होताच लगेचच विली सेमेडो याने अप्रतिम खेळ दाखवत दुसरा गोल केला आणि संघाची आघाडी दुप्पट केली, ज्यामुळे विजयावरची त्यांची पकड मजबूत झाली. त्यानंतर सामना संपत असताना अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या स्टोपिराने तिसरा आणि निर्णायक गोल डागून विजयावर शिक्कामोर्तब केले.