भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या T20 विश्वचषक 2026 साठी संघांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून, कॅनडा संघाने नुकतेच आपले स्थान निश्चित केले आहे. अमेरिकन पात्रता फेरीत बहामास संघाचा सात गडी राखून पराभव करत कॅनडाने विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. विशेष म्हणजे, कॅनडाने T20 विश्वचषक 2024 मध्येही सहभाग घेतला होता.
T20 विश्वचषक 2026 साठी कॅनडाच्या समावेशानंतर आतापर्यंत एकूण 13 संघांनी आपली जागा पक्की केली आहे. यजमान म्हणून भारत आणि श्रीलंकेच्या संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. तर, आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांनी आयसीसी क्रमवारीच्या आधारे आपले स्थान मिळवले आहे. याव्यतिरिक्त, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आधीच पात्र ठरले आहेत.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील उर्वरित सात जागांसाठी अद्याप चुरस बाकी आहे. युरोपीय पात्रता फेरीतून दोन संघ (5 ते 11 जुलै), आफ्रिकन पात्रता फेरीतून दोन संघ (19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर) आणि आशियाई ईएपी पात्रता फेरीतून तीन संघ (1 ते 17 ऑक्टोबर) मुख्य स्पर्धेत दाखल होतील.
पात्रता फेरीतील सामन्यात बहामासचा संघ कॅनडासमोर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. बहामासचा संपूर्ण संघ केवळ 57 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात, कॅनडाने हे लक्ष्य सहज गाठले. दिलप्रीत बाजवाच्या नाबाद 36 धावांच्या खेळीमुळे कॅनडाने केवळ 5.3 षटकांतच विजय नोंदवला. तत्पूर्वी, कॅनडाचे फिरकी गोलंदाज कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेत बहामासच्या संघाला अल्प धावसंख्येवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.