पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून (दि.26) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना अजून एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर या बातमीद्वारे जाणून घेवूया 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये दोघांना कोणते विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका ही 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे दोन्ही संघाना ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ही मालिका जिंकणे महत्वाचे आहे. मालिकेत आघाडी घेण्याची दृष्टीने दोन्ही संघ उद्या मैदानामध्ये उतरणार आहेत. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी घेण्याची संधी आहे. त्याला 200 विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त सहा विकेट्स दूर आहे. त्याने जर या सामन्यात सहा विकेट्स मिळवल्या तर अशी कामगिरी करणारा तो 12वा भारतीय गोलंदाज बनणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 43 कसोटींमध्ये, बुमराहने 19.52 च्या सरासरीने 194 बळी घेतले आहेत. 6/27 ही त्याची सर्वोतत्तम गोंलदाजी प्रदर्शन आहे. तर त्याने 15 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
बुमराह हा आतापर्यंतच्या मालिकेतील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. सातत्याच्या बाबतीत त्याचा वरचष्मा कायम आहे. त्याने या मालिकेतील 3 सामन्यांत 10.90 च्या सरासरीने 21 बळी घेतले आहेत. तर 6/76 अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या मालिकेमध्ये त्याने दोन वेळा एकाच डावात पाच बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 10 कसोटींमध्ये 17.15 च्या सरासरीने 53 बळी घेतले आहेत.
या सामन्यामध्ये टीम इंडिचा अष्टपैलू रविंद्र जडेजा 600 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला 600 विकेट्स पूर्ण करण्यासाठी फक्त सात विकेट्सची गरज आहे. त्याने या सामन्यामध्ये या पराक्रम केला तर अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरणार आहे. त्याने खेळलेल्या 349 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.04 च्या सरासरीने 593 विकेट्स घेतल्या आहेत, त्याच्या नावावर 17 फिफर आहेत. तर 7/42 च्या सर्वोत्तम आकड्यांचा समावेश आहे. त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याचा विक्रम चांगला आहे. त्यांच्या विरुद्धच्या 18 कसोटीमध्ये त्याने 20.35च्या सरासरीने 89 विकेट्स घेतल्या आहेत, त्यामध्ये 7/42 च्या सर्वोत्तम आकड्यांचा समावेश आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या टेस्टमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.