स्पोर्ट्स

Prithvi Shaw Century : १६ चौकार-षटकारांसह पृथ्वी शॉचा शतकी धमाका! महाराष्ट्रासाठी केली दमदार कामगिरी

चेन्नई येथे सुरू असलेल्या बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे.

रणजित गायकवाड

Buchi Babu Trophy 2025 Prithvi Shaw scores century for Maharashtra

चेन्नई येथे सुरू असलेल्या बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत युवा फलंदाज पृथ्वी शॉने दमदार शतकी खेळी साकारली आहे. या स्पर्धेत तो महाराष्ट्र संघाकडून खेळत असून, आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ही लक्षवेधी कामगिरी केली आहे.

या स्पर्धेतील तिसरा सामना महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने शानदार शतक झळकावले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र संघासाठी शॉचा हा पदार्पणाचा सामना आहे. यापूर्वी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत होता. छत्तीसगडविरुद्धच्या या सामन्यात त्याने १४१ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १११ धावांची खेळी केली.

शॉच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्राच्या २१७ धावा

या सामन्यात महाराष्ट्राची सुरुवात अत्यंत दमदार झाली. पृथ्वी शॉ आणि सचिन दास यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी रचली, ज्यामध्ये ५५ धावा एकट्या शॉच्या होत्या. आपल्या या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने ९ चौकार लगावले होते. पहिला गडी बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचा डाव काहीसा गडगडला. मात्र, शॉने एक बाजू लावून धरत संघाचा डाव सावरला. या सामन्यात महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २१७ धावा करून सर्वबाद झाला. शॉ या सामन्यात शुभम अग्रवालच्या गोलंदाजीवर यष्टिचित झाला.

शतकी खेळीनंतर पृथ्वी शॉची प्रतिक्रिया

शतकी खेळीनंतर पृथ्वी शॉने आपल्या कारकिर्दीविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पृथ्वी शॉ म्हणाला, ‘पुन्हा नव्याने क्रिकेट सुरू करण्यास मला कोणतीही अडचण नाही, कारण मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी एक आत्मविश्वासू व्यक्ती आहे आणि मला स्वतःवर तसेच माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. मला आशा आहे की हा हंगाम माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी खरोखरच चांगला असेल.’

मला कोणाचीही सहानुभूती नको - पृथ्वी शॉ

त्याने पुढे सांगितले, ‘मी काहीही बदललेले नाही. मी फक्त मूलभूत गोष्टींकडे परतलो आहे; ज्या गोष्टी मी १९ वर्षांखालील गटात असल्यापासून करत आलो आहे, ज्यामुळे मला भारतीय संघात स्थान मिळाले होते. मी पुन्हा त्याच गोष्टी करत आहे. अधिक सराव, व्यायामशाळेत (जिम) जाणे, धावणे. साहजिकच, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी हे सर्व वयाच्या १२-१३ वर्षांपासून करत आहे.’

यावेळी पृथ्वी शॉने हेदेखील स्पष्ट केले की, ‘मला कोणाचीही सहानुभूती नको आहे. मी यापूर्वीही असे अनुभव घेतले आहेत. मला माझ्या कुटुंबाची मित्रांची साथ मिळाली. हे सर्व माझ्यासोबत कठीण काळात माझ्या पाठीशी खंभीरपणे उहे राहिले.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT