brazil vs morocco fifa world cup 2026 match analysis highlights
कधीकधी मैदानावर नोंदवला गेलेला एखादा गोल केवळ सामन्याचा निकाल ठरवत नाही, तर तो एखाद्या देशाच्या फुटबॉलची दिशा बदलतो किंवा एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीला एका रात्रीत एका सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवतो. चालू फीफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2026) आपल्याला अगदी अशाच दोन ऐतिहासिक गोल्सचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. या दोन गोल्सनी सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
ज्या सामन्याची फुटबॉलप्रेमी जगभर आतुरतेने वाट पाहत होते, तो ब्राझील विरुद्ध मोरक्को सामना म्हणजे फुटबॉलमधील दोन महाकाय शक्तीशाली संघांमधील अस्सल युद्ध होते. यंदाच्या वर्ल्डकपमधील हा एकमेव असा ग्रुप आहे, जिथे फिफा रँकिंगमधील टॉप-१० मधील दोन संघ आमनेसामने आले आहेत. ६ व्या क्रमांकावरील ब्राझील आणि ७ व्या क्रमांकावरील मोरक्को यांच्यातील हा सामना इतका थरारक झाला की, निःसंशयपणे हा या वर्ल्डकपमधील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सामना ठरला.
आता या सामन्याचे विश्लेषण करताना आपल्याला 'हाफ' ऐवजी 'क्वार्टर्स' असा शब्दप्रयोग करावा लागेल. कारण बदललेल्या नियमांनुसार, दर २५ मिनिटांनी होणाऱ्या हायड्रेशन ब्रेकमुळे हा सामना २५-२५ मिनिटांच्या चार क्वार्टर्समध्ये खेळवला गेल्यासारखा वाटला.
वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी अनेकांनी मोरक्कोला 'डार्क हॉर्स' अर्थात अपेक्षित नसताना धक्का देणारा संघ म्हटले होते. पण मोरक्को आता डार्क हॉर्स राहिलेला नाही, तर तो एक परिपक्व आणि बलाढ्य फुटबॉल राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाला आहे. २०२२ च्या वर्ल्डकपमधील त्यांच्या कामगिरीपेक्षाही त्यांच्या तळागाळातील फुटबॉल रचनेवर नजर टाकली, तर त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षांत केलेली प्रगती थक्क करणारी आहे. युरोपियन देशांशी स्पर्धा करू इच्छिणाऱ्या प्रत्येक देशासाठी मोरक्कोचे फुटबॉल मॉडेल ही एक उत्तम 'केस स्टडी' आहे.
मोरक्कोचे तरुण खेळाडू सध्या जागतिक स्तरावर धुमाकूळ घालत आहेत. अर्जेंटिनाला फायनलमध्ये हरवून अंडर-२० वर्ल्डकप जिंकणारा मोरक्कोचा हाच संघ भविष्यातील सुपरस्टार्सची खाण आहे. सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेला बुआ दिदी असो, रोम कडून खेळणारा खतरनाक मिडफिल्डर नील एल आयनुई असो, वा बिलाल एलखनूस आणि उनाही; या सर्वांनी ब्राझीलच्या बलाढ्य संघाला पूर्वार्धात अक्षरशः नाकीनऊ आणले होते. सायबारीने जेव्हा जेव्हा मोरक्कोसाठी गोल केला आहे, तेव्हा तो संघ कधीच हरलेला नाही, हा इतिहास इथेही कायम राहिला.
पहिल्या २५ मिनिटांत मोरक्कोच्या खेळाडूंनी ब्राझीलला मैदानावर अक्षरशः नचावले. त्यांचा खेळ पाहून ब्राझील हा जागतिक दर्जाचा संघ आहे की एखाद्या स्थानिक डिव्हिजनमधला, असा प्रश्न पडावा इतकी त्यांची अवस्था बिकट झाली होती. मोरक्कोच्या जबरदस्त आक्रमणासमोर ब्राझीलचे मिडफिल्डर्स निष्प्रभ ठरले. अखेर ब्राहिम डियासच्या एका कल्पक असिस्टवर सायबारीने कोणतीही चूक न करता अप्रतिम गोल केला आणि मोरक्कोचे खाते १-० ने उघडले.
ब्राझीलचा संघ मैदानावर संघर्ष करताना दिसला त्यांचे कॅसमीरो, ब्रूनो गुमारिश व पाकेता यांसारखे दिग्गज खेळाडू निष्प्रभ ठरत होते. मात्र, दुस-याबाजूने विनिशियस ज्युनियर संघासाठी 'संकटमोचक' म्हणून धावून आला. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला विनिशियसने नोंदवलेला तो अद्भूत गोल केवळ सामन्याचाच नव्हे, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचाही 'टर्निंग पॉईंट' ठरू शकतो.
रियल माद्रिदसाठी सर्व काही जिंकणाऱ्या विनिशियसवर ब्राझीलसाठी मोठ्या प्रसंगी न चालण्याचा शिक्का मारला जात होता. २०२४ चा 'बॅलन डी ओर' (Ballon d'Or) पुरस्कार त्याला न मिळण्यामागे त्याचे कोपा अमेरिकेतील अपयश कारणीभूत होते. ५० आंतरराष्ट्रीय सामन्यांत अवघे १० ते १५ गोल्स करणाऱ्या विनिशियसने मोरोक्को विरुद्धच्या सामन्यात मात्र ब्राझीलला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले. ३२ व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर ९० व्या मिनिटांपर्यंत सामना ‘फिफ्टी-फिफ्टी’ असा अटीतटीचा झाला.
कार्लो अँचलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा ब्राझील संघ पूर्वीसारखा आक्रमक खेळणारा राहिलेला नाही, तर तो प्रतिस्पर्ध्यांच्या चुकीची वाट पाहणारा आणि दबाव हेरून आक्रमण करणारा संघ बनला आहे. नेमारच्या अनुपस्थितीत विनिशियसने संघाला सावरले आणि सामना १-१ अशा बरोबरीत सुटला.
दुसरीकडे, स्वित्झर्लंड विरुद्ध कतार या सामन्यात फुटबॉलमधील एका जुन्या नियमाची पुनरावृत्ती झाली—'तुम्ही कितीही वेळ चेंडू स्वतःकडे ठेवा, जोपर्यंत तुम्ही सामना संपवत नाही, तोपर्यंत विरोधी संघ शर्यतीत जिवंत राहतो.'
संपूर्ण सामन्यात स्वित्झर्लंडने कमालीचे वर्चस्व राखले होते. कतारला त्यांनी डोके वर काढण्याची संधीच दिली नव्हती. स्विस स्ट्रायकर ब्रिल एम्बोलोने अनेक सोपे चान्सेस गमावले. परंतु, सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला कतारला एक सुवर्णसंधी मिळाली आणि त्यांनी त्याचे गोलमध्ये रूपांतर करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.
हा गोल कतारच्या फुटबॉल इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. कारण हा केवळ या वर्ल्डकपमधील कतारचा पहिला गोल नव्हता, तर फिफा वर्ल्डकपच्या इतिहासातील कतारचा हा 'पहिलावहिला' गुण ठरला आहे. या एका गुणाच्या जोरावर कतार आता आपल्या ग्रुपमधून कॅनडा आणि बोस्नियाविरुद्ध सकारात्मक निकाल मिळवून 'राउंड ऑफ ३२' (नॉकआउट स्टेज) साठी पात्र ठरू शकतो. जर असे झाले, तर कतारच्या फुटबॉल विश्वात हा गोल शतकानुशतके लक्षात ठेवला जाईल.