पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्रजीत बोलायचं आहे...या विचारानेच आपल्याकडे भल्याभल्यांची भंबेरी उडते. कारण इंग्रजी आपली मातृभाषा नाही दुसरं काहींना ही भाषा कळत असली तरी बाेलण्याचा सराव नसताे. त्यामुळे एखादी भाषा व्यवस्थित बाेलता येत नसेल तर त्याची कबुली द्यावी, हे शहाणपणाचे लक्षण. मात्र मोडके-तोडके इंग्रजी बोलत स्वत:च हसे करणारे अनेकजण असतात. आता यामध्ये भर पडली आहे ती पाकिस्तानच्या वन-डे संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याची. त्याने मोडके-तोडके इंग्रजी बोलत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चे हसे केले आहे. त्याच्या अचाट इंग्रजी भाषेवर सोशल मीडियावर हास्याचे फवारे उडत आहेत. यामुळेच त्याच्या 'इंग्रजी'ची खिल्ली उडविण्याचा मोह ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याला आवरत आला नाही. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मोहम्मद रिझवानच्या इंग्रजीची खिल्ली उडवली. यावर पाकिस्तानी क्रिकेट चााहते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच त्यांना यानिमित्त उर्दू भाषेचेही स्मरण झाल्याचे दिसत आहे.
ब्रॅड हॉग हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो कर्णधार मोहम्मद रिझवानच्या इंग्रजीची खिल्ली उडवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हॉग हा एका मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसत आहे. तो रिजवानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचे दिसते. हॉग रिजवानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला विचारताे की, "विराटबद्दल तुला काय वाटते?" यावर ती व्यक्ती म्हणते, 'विराट आणि मी एकसारखे आहोत. विराट पाणी पितो आणि मीही पाणी पितो. तोही अन्न खातो, मीही अन्न खातो. आम्ही दोघेही सारखेच आहोत. त्यात काही फरक नाही.' हा व्हिडिओ भारतात तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण रिझवानची खिल्ली उडवत आहेत. त्याचे इंग्रजी संभाषण विनोदाचा विषय झाला आहे.
ब्रॅड हॉगने शेअर केलेला व्हिडिओ पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना चांगलाच झोंबला आहे. ते हॉगला ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, आपण उपखंडात राहणाऱ्या लोकांनी या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे.' इंग्रजी ही आपली भाषा किंवा मातृभाषा नाही. याशिवाय, आपल्या खेळाडूंनी उर्दूमध्ये बोलावे आणि त्यांच्यासोबत त्यांचा अनुवादकही घ्यावा." असा सल्ला देखील त्याने रिझवानला दिला आहे. एका क्रिकेट चाहत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मला वाटतं ऑस्ट्रेलियन लोकांना ब्रॅड हॉगची लाज वाटत असेल.' 'चुकीचे.' तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कोणाचाही असा अमवान करु शकत नाही. हे योग्य भावनेने केले गेले नसल्याचे एका चाहत्याने म्हटलं असून अशा असंख्य पोस्टने हॉग याला ट्रोल केले जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण सात कसोटी, १२३ वन-डे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. १३ कसोटी डावांमध्ये ५४.८८ च्या सरासरीने १७ बळी, ११३ एकदिवसीय डावांमध्ये २६.८५ च्या सरासरीने १५६ आणि १५ टी-२० डावांमध्ये ५३.२९ च्या सरासरीने सात बळी घेतले आहेत. फंदाजीत त्याने ऑस्ट्रेलियासाठी १० कसोटी डावांमध्ये २६.५७ च्या सरासरीने १८६ धावा, ६५ एकदिवसीय डावांमध्ये २०.२६ च्या सरासरीने ७९० तर चार टी-२० डावांमध्ये १३.७५ च्या सरासरीने ५५ धावा केल्या आहेत.