पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील मुष्टीयोद्धा (बॉक्सर) जॉर्ज फोरमन ( George Foreman) यांचे शुक्रवारी (दि. 21 मार्च) निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली. बॉक्सिंग इतिहासातील सर्वात वयस्कर हेवीवेट विजेतेपदाचा मान त्यांनी मिळवला होता.
जॉर्ज फोरमन यांच्या कुटुंबीयांनी निवेदनात म्हटलं आहे की, आमचे लाडके जॉर्ज एडवर्ड फोरमन सीनियर यांच्या निधनाची घोषणा आम्ही अत्यंत दुःखाने करत आहोत. २१ मार्च २०२५ रोजी त्यांनी आम्हाला निरोप दिला. फोरमन निर्भय आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ८१ बॉक्सिंग सामने लढले. यापैकी ७६ जिंकले. केवळ पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिकमध्ये त्यांनी हेवीवेट विभागात सुवर्णपदकही जिंकले होते.
जॉर्ज फोरमन हे एक एक धर्माभिमानी उपदेशक, एक समर्पित पती, एक प्रेमळ वडील, एक मानवतावादी, एक ऑलिंपियन आणि दोन वेळा जगातील हेवीवेट चॅम्पियन होते. अढळ श्रद्धा, नम्रता आणि उद्देशपूर्ण जीवन जगले. ते आपले जीवन सन्मानाने जगला. ते कुटुंबासाठी एक शक्ती होते. सर्वांकडून मिळालेल्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत, असेही कुटुंबीयांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
जॉर्ज फोरमन हे मूळचे अमेरिकेतील टेक्सासमधील रहिवासी होते. १९६८ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकत त्यांनी बॉक्सिंग कारकिर्दीची दिमाखदार सुरुवात केली. यानंतर फोरमन यांनी १९७३ मध्ये तत्कालीन अपराभूत मानला जाणार मुष्टीयोद्धा जो फ्रेझियर याला हरवून जागतिक हेवीवेट विजेतेपद जिंकले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत दोनवेळा हेवीवेट विजेतेपदाचा मिळवला होता. १९७४ मध्ये 'रंबल इन द जंगल' सामन्यात त्यांचा मोहम्मद अली यांनी पराभव केला होता. १९७७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. मात्र एक दशकानंतर १९९४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन केले. १९९४ मध्ये मायकेल मूररचा पराभव करत हेवीवेट बेल्ट जिंकले. त्यावेळी फोरमन यांचे वय ४६ वर्षे, १६९ दिवस होते. बॉक्सिंगमध्ये जागतिक हेवीवेट अजिंक्यपद जिंकणारे ते सर्वात वयस्कर पुरुष ठरले. या सामन्यावेळी मायकेल मूर हा त्यांच्यापेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८१ सामन्यांपैकी ७६ सामने जिंकले. यातील ६८ नॉकआउटचा समावेश होता. शॅनन ब्रिग्जविरुद्ध पराभवानंतर अखेर १९९७ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी निवृत्ती जाहीर केली.