नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताची महिला बॉक्सर आणि राज्यसभा खासदार मेरी कोम नवीन वादात अडकली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने लागू केलेल्या क्वारंटाईन प्रोटोकॉलचे मेरी कोम यांनी उल्लंघन केले आहे. सुरक्षेसंबंधित प्रोटोकॉल तोडून त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.
हल्लीच मेरी कोम जॉर्डनमध्ये आयोजित आशिया- ओसियाना ऑलंम्पिक पात्रता फेरीत खेळून १३ मार्च रोजी भारतात परतल्या. भारतात आल्यानंतर मेरी कोम यांनी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये जायला हवे होते. मात्र, त्या थेट १८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या खानपानच्या (ब्रेकफास्ट) कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केलेल्या एका छायाचित्रात मेरी कोम इतर राज्यसभा खासदारांसोबत दिसून आल्या आहेत.
याशिवाय या कार्यक्रमात भाजपचे खासदार दुष्यंत सिंह देखील उपस्थित राहिले होते. ते याआधी कोरोना पॉझिटिव्ह गायिका कनिका कपूर हिने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. मात्र, दुष्यंत सिंह यांनी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
मेरी कोम यांनी जॉर्डनमध्ये पात्रता फेरी पार करून ऑलंम्पिकसाठी आपले तिकिट निश्चित केले आहे. या स्पर्धेपूर्वी त्या भारतीय बॉक्सिंग संघासोबत इटलीला देखील गेल्या होत्या.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमच्या नावावर सहा सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक आहे. यासोबतच मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू आहे.