पुढारी ऑनलाईन डेस्क : खेळ कोणताही असो खेळाडू आपल्या कामगिरीने देशाचे नाव उंचावत असतो. आजवर विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंनी आपल्या कामगिरीने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. अशाच दिग्गज खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी नाव आहे ते म्हणजे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे. विराट आणि त्याचे विक्रम हा नेहमीच भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरतो. आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याचे नाव चर्चेत आले आहे. हा 'विराट फिव्हर' आता ऑस्ट्रेलियातील माध्यमात पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियातील विविध वृत्तपत्रांनी विराटला पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. तसेच या पानावर हिंदी आणि पंजाबी भाषेतून मथळेही देण्यात आले आहेत. (Border-Gavaskar Trophy)
ऑस्ट्रेलियात रंगणार्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये दाखल झाला. याची दखल ठळक दखल ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी घेतली आहे. चक्क हिंदी आणि पंजाबीमध्ये भाषेमधील मथळ्यांसह विराट कोहलीचे पूर्ण पानाचे पोस्टरला पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्धी देण्यात आली आहे. विराटच्या अफाट लोकप्रियतेला आणि आगामी कसोटी मालिकेतील महत्त्वच विविध वृत्तपत्रांनी अधोरेखित केले आहे. दैनिकाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे नवीन नाव ॲशेस का आहे, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सामने कसे होतील याविषयीचे विशेष स्तंभही आहेत. यामध्ये फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या कामगिरीचीही दखल घेण्यात आली आहे.पहिल्या पानावर युगों की लडाई असा हिंदी भाषेतील मथळाही देण्यात आला आहे. तर एका लेखात युवा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या लेखाला "नवम राजा" असा पंजाबी भाषेतील मथळा देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान टी-20 मालिकेकडे ऑस्ट्रेलिया माध्यमांनी दुर्लक्ष केले असून आपले सर्व लक्ष आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी वेधले आहे, असा त्रागा पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी केला होता. आता विराटसह भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रसिद्ध होत आहे. यावरुन गिलेस्पी यांचा दावा खरा असल्याचे स्पष्ट होते आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. आता गोपनीयतेची काळजी घेण्यासाठी भारतीय संघाची सराव सत्रे बंद दाराआड आयोजित केली जाणार आहेत. भारत अ विरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी नियोजित होता, दुखापतीच्या चिंतेमुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी विराट कोहलीसह भारताच्या युवा खेळाडूंचेही जंगी स्वागत केले आहे. आता बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत कमबॅक करण्याचे मोठे आव्हान विराट कोहलीसमोर असणार आहे. कारण नुकतेच मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली. मागील सात वर्षांतील त्याच्या धावांची सरासरी निच्चांकी नोंदली गेली आहे. त्याने या मालिकेत 15.50 च्या सरासरीने केवळ ९३ धावा केल्या. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीकाही झाली. आता टीकाकारांना विराट आपल्या बॅटने कसे उत्तर देणार, यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.