पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy : टीम इंडिया आणि आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ अवघ्या 150 धावा करून ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कांगारू संघाचे 7 फलंदाज 67 धावांत माघारी पाठवले. पहिल्या डावाच्या आधारे यजमान संघ अजूनही भारतापेक्षा 83 धावांनी मागे आहे. ॲलेक्स कॅरी (19*) आणि मिचेल स्टार्क (6*) सध्या नाबाद आहेत. भारताकडून बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले, तर पदार्पणवीर हर्षित राणाने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माची अनुपस्थिती आणि शुभमन गिलच्या दुखापतीमुळे यशस्वी जैस्वाल साथीने केएल राहुलने डावाची सुरुवात केली. पण भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पुन्हा एकदा पहायला मिळाला.
पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचलेल्या जैस्वालची सुरुवात चांगली झाली नाही. तो खातेही न उघडता मिचेल स्टार्कचा बळी ठरला. यानंतर देवदत्त पडिक्कलही 23 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. विराट कोहलीही केवळ पाच धावा करून झटपट माघारी परतला.
यानंतर कर्णधार बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पलटवार केला. जो भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरली. बुमराहने उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्सला बाद करत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. याशिवाय मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनीही आश्चर्यकारक कामगिरी केली. सिराजने मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर राणाने ट्रॅविस हेडच्या दांड्या गुल केल्या.
केएल राहुल खूप चांगल्या लयीत दिसत होता, परंतु एका वादग्रस्त निर्णयामुळे त्याच्यावर तंबूत परतण्याची नामुष्की ओढवली. राहुलने 74 चेंडूंचा सामना करत 26 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रातच चार विकेट घेत भारताला बॅकफूटवर टाकले. जोश हेझलवूड आणि स्टार्कने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
दुसरे सत्र सुरू होताच भारताने वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांच्या विकेट्स गमावल्या. ज्यामुळे संघाची अवस्था 6 बाद 73 धावा अशी झाली. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि पदार्पण करणारा नितीश रेड्डी यांनी भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. ही जोडी पॅट कमिन्सने पंतला बाद करून फोडली. पंतने 37 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. यावेळी भारताची धावसंख्या 7 बाद 121 होती. यानंतर हर्षित राणा (7)ची विकेट 128 धावांवर पडली. नितीशने बुमराहसह (8) नवव्या विकेटसाठी 16 धावांची भागीदारी केली. पण बुमराह जास्तवेळ टीकू शकला नाही. येथून पुढे नितीशने जोखीम पत्करण्यास सुरुवात केली. पण त्याला यश आले नाही. तो बाद होताच भारताचा दाव 150 धावांत गुंडाळला. नितीशने 59 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकत सर्वाधिक 41 धावा केल्या.
परदेशी भूमीवर कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ ऑलआऊट होण्याची ही 9वी वेळ आहे. मात्र, यावेळी भारताने सर्वात कमी षटके (49.4) खेळली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले.
यानंतर कर्णधार बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पलटवार केला. जो भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरली. बुमराहने उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्सला बाद करत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. याशिवाय मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनीही आश्चर्यकारक कामगिरी केली. सिराजने मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर राणाने ट्रॅविस हेडच्या दांड्या गुल केल्या.
केएल राहुलने पहिल्या डावात 26 धावा केल्या. या खेळीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 26 वा फलंदाज ठरला आहे. 2014 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 54 कसोटी सामने खेळले आहेत. तो 92 डावांमध्ये 33.78 च्या सरासरीने 3,007 धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 कसोटीत 644 धावा केल्या आहेत.
मिचेल स्टार्क भारताविरुद्ध 50 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा 8वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, हेझलवूड, मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, रिची बेनॉड आणि ग्लेन मॅकग्रा यांनी ही कामगिरी केली होती. स्टार्कने पहिल्या डावात 11 षटके टाकली आणि 3 मेडन षटकांसह 14 धावांत 2 बळी घेतले. त्याने भारताविरुद्ध 27.37 च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे.
हेझलवूडने 13 षटके टाकत 29 धावा दिल्या आणि 4 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने देवदत्त पडिक्कल (0), विराट कोहली (5), हर्षित राणा (7) आणि बुमराह (8) यांना आपले बळी बनवले. हेजलवूडने चौथ्यांदा कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहलीला सर्वाधिक बाद करणारा तो संयुक्तपणे दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ठरला आहे. पहिल्या स्थानावर कमिन्स आहे, ज्याने कोहलीला 5 वेळा बाद केले आहे.
बुमराह आणि कमिन्स ही वेगवान गोलंदाजांची पहिली जोडी आहे जी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार आहेत. यापूर्वी भारताचे वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी यांनी 1985-86 मध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
कांगारू संघाच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. स्मिथ दुसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला आहे. 2014 मध्ये, त्याला द. आफ्रिकेच्या डेल स्टेनने गोल्डन डकवर शिकार केली होती.