स्पोर्ट्स

FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

जाणून घ्या FIFA World Cup मधील सर्वात थरारक 10 उलटफेर..

रणजित गायकवाड

जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणारा फिफा विश्वचषक २०२६ आता अगदी काही दिवसांवर आला असून, फुटबॉल चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या मैदानावर फक्त गोलचे विक्रमच रचले जात नाहीत, तर कित्येक बड्या संघांचे अहंकारही चक्काचूर होतात, हा विश्वचषकाचा रंजक इतिहास आहे. गतविजेत्यांचे साखळी फेरीतच गाशा गुंडाळणे असो, की फुटबॉलच्या जगातील 'जायंट्स'ना नवख्या 'मिनोज'नी धूळ चारणे असो; फिफाच्या मैदानाने नेहमीच अनपेक्षिततेचा थरार अनुभवला आहे. अगदी गतवेळच्या विश्वचषकात सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाला दिलेला पराभवाचा धक्का याचे ताजे उदाहरण. फुटबॉल जगताला थक्क करणाऱ्या फिफा विश्वचषक इतिहासातील अशाच काही ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या धक्कादायक सामन्यांचा हा विशेष वृत्तांत...

अमेरिका १-० इंग्लंड (१९५०)

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ कमालीचा फॉर्मात होता. आल्फ रॅमसे, टॉम फिनी आणि बिली राईट यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला इंग्लंडचा संघ या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. दुसरीकडे, अमेरिकेच्या संघात अर्धवेळ काम करणाऱ्या खेळाडूंचा भरणा होता, ज्यात एक भांडी घासणारा, एक पोस्टमन आणि एका शिक्षकाचा समावेश होता. वेगवेगळ्या क्षेत्रांतील या खेळाडूंनी केवळ काही दिवस एकत्र सराव केला आणि ब्राझीलला जाण्यासाठी ते जहाजात बसले.

स्पर्धेत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान होते. त्या सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला जो गॅटजेन्सने हेडरद्वारे शानदार गोल करत अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने गोल करण्यासाठी आक्रमणाची मालिकाच लावली, परंतु अमेरिकेचा गोलरक्षक फ्रँक बोर्गी याने इंग्लंडचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अमेरिकेने हा सामना जिंकून फुटबॉलच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले.

पश्चिम जर्मनी ३-२ हंगेरी (१९५४)

आजच्या काळात जर्मन संघाने सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करत विजय मिळवणे ही आश्चर्यकारक गोष्ट मानली जात नाही. मात्र, १९५४ मध्ये परिस्थिती वेगळी होती. त्याकाळी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या हंगेरीच्या संघासमोर पश्चिम जर्मनीचा संघ अत्यंत कमकुवत होता. हंगेरीच्या आक्रमणाची धुरा महान फुटबॉलपटू फेरेंक पुस्कास यांच्याकडे होती. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात हंगेरीचा संघ जेतेपदाचा मुख्य दावेदार म्हणून उतरला होता. त्यांनी साखळी फेरीत दक्षिण कोरियाचा ९-० आणि पश्चिम जर्मनीचा ८-३ असा धुव्वा उडवत आपला दबदबा सिद्ध केला होता.

अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. अपेक्षेप्रमाणे हंगेरीने पूर्वार्धात दोन गोल करत सामन्यावर पकड मिळवली. परंतु, पश्चिम जर्मनीने अनपेक्षित खेळ करत दोन गोल करून बरोबरी साधली. सामना ८४ व्या मिनिटापर्यंत २-२ अशा बरोबरीत होता, त्याच वेळी हेल्मुट रानने आपला दुसरा गोल नोंदवला आणि हंगेरीच्या चाहत्यांचा आवाज बंद केला. फुटबॉलच्या इतिहासातील एका सर्वोत्तम संघाविरुद्ध प. जर्मनीने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयाला 'द मिरॅकल ऑफ बर्न' म्हणून ओळखले जाते.

उत्तर कोरिया १-० इटली (१९६६)

उत्तर कोरियाचा संघ इंग्लंडमधील विश्वचषकासाठी पात्र ठरला, हीच मुळात एक मोठी आश्चर्याची गोष्ट होती. पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या दक्षिण कोरियासोबत सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे, इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशनने उत्तर कोरियाच्या खेळाडूंचा व्हिसा नाकारण्याचाही विचार केला होता.

दुसरीकडे, इटलीच्या संघाची भिस्त जियाकोमो बुल्गारेली याच्यावर होती. मात्र, सामन्यादरम्यान हा मिडफिल्डर दुखापतग्रस्त झाला. त्या काळात बदली खेळाडू मैदानात उतरवण्याची परवानगी नसल्यामुळे इटलीला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. या घटनेच्या अवघ्या सात मिनिटांनंतर, उत्तर कोरियाच्या पाक डू इक याने शानदार गोल केला. या एकमेव गोलच्या जोरावर उत्तर कोरियाने केवळ विजयच मिळवला नाही, तर दोन वेळच्या विश्वविजेत्या संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

हा सामना विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या धक्कादायक निकालांपैकी एक मानला जातो. त्या सामन्याचे मूळ तिकीट आजही फिफाच्या फुटबॉल संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे. ज्या स्टेडियममध्ये हा गोल झाला होता, ते स्टेडियम पाडून तिथे गृहनिर्माण वसाहत तयार करण्यात आली असली, तरी गोल झालेल्या जागेवर लोखंडी खिळ्यांचे निशाण बनवून ती जागा ‘चिन्हांकित’ करण्यात आली आहे.

अल्जेरिया २-१ पश्चिम जर्मनी (१९८२)

पश्चिम जर्मनीचा संघ १९८२ च्या विश्वचषकात युरोपियन चॅम्पियन आणि दोन वेळचा विश्वविजेता म्हणून उतरला होता. हान्सी म्युलर, वोल्फगांग ड्रेमलर, कार्ल-हाइन्झ रुमेनिगे आणि लोथर मथायस यांसारख्या स्टार खेळाडूंनी सजलेला हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. दुसरीकडे, अल्जेरियाच्या संघात अनेक नवखे आणि अपरिचित चेहरे होते, परंतु विश्वचषकापूर्वी त्यांनी चांगली कामगिरी केली होती.

जर्मन संघाचा अतिआत्मविश्वासच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला रबाह माद्जेरने गोल करून जर्मनीला पहिला झटका दिला. त्यानंतर रुमेनिगेच्या गोलमुळे जर्मनीने १-१ अशी बरोबरी साधली खरी, पण काही वेळातच अल्जेरियाचा फॉरवर्ड लखदर बेलोमी याने सुरेख गोल करत पश्चिम जर्मनीसह संपूर्ण फुटबॉल जगताला थक्क केले. अल्जेरियाने हा सामना २-१ असा जिंकून नवा इतिहास रचला.

कॅमेरून १-० अर्जेंटिना (१९९०)

१९८६ चे जेतेपद नावावर असलेला अर्जेंटिना संघ १९९० च्या विश्वचषकातही जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरला होता. जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू दिएगो माराडोना यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनासाठी उद्घाटनाचा हा सामना अत्यंत सोपा मानला जात होता. त्यांच्याविरुद्ध उभा असलेला कॅमेरूनचा संघ आपला पहिलाच विश्वचषक खेळत होता आणि या स्पर्धेत उतरणारा तो एकमेव आफ्रिकन देश होता.

मिलानच्या ऐतिहासिक 'सॅन सिरो' स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या उद्घाटन सामन्यात अर्जेंटिनाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. मात्र, कॅमेरूनच्या बचावफळीने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावत अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखले. बलाढ्य संघाला रोखण्यात यश आल्यामुळे आफ्रिकन संघाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला.

अखेर उत्तरार्धात सामन्याला कलाटणी मिळाली; फ्रँकोइस ओमाम-बियिकने फ्री-किकवर एक अप्रतिम हेडर मारत कॅमेरूनला १-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली, जी सामन्याच्या शेवटच्या शिट्टीपर्यंत कायम राहिली. गतविजेत्या अर्जेंटिनाचा हा धक्कादायक पराभव फुटबॉल जगताला हादरवून सोडणारा ठरला.

फ्रान्स ०-१ सेनेगल (२००२)

२००२ च्या फिफा विश्वचषकाचा तो उद्घाटन सामना फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठे 'महायुद्ध' ठरला. एकीकडे झिनेदिन झिदानसारख्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेला गतविजेता फ्रान्सचा संघ, तर दुसरीकडे आपला पहिलाच विश्वचषक खेळणारा नवखा सेनेगल! इतिहास पाहिला तर फ्रान्स हा पूर्वी सेनेगलवर राज्य करणारा देश होता, त्यामुळे या सामन्याला मैदानाबाहेरही एक वेगळीच किनार होती.

सामना सुरू झाला आणि क्रीडा समीक्षकांचे सर्व अंदाज हवेत विरले. फ्रान्सच्या वादळी आक्रमणाची धार बोथट करण्यासाठी सेनेगलने मैदानावर अभेद्य चक्रव्यूह रचला होता. अल हाडजी दिओफच्या चित्तासारख्या वेगाने फ्रेंच बचावफळीची दाणादाण उडवली. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला पापा बुबा डिओपने गोलपोस्टच्या जाळ्यात चेंडू ढकलला आणि संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झाले.

उत्तरार्धात फ्रान्सने बरोबरीसाठी सर्व शक्ती पणाला लावली, पण सेनेगलच्या पोलादी बचावापुढे त्यांचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. अखेर ९० मिनिटांच्या थरारानंतर सेनेगलने १-० असा ऐतिहासिक विजय मिळवून फुटबॉल जगताला सर्वात मोठा धक्का दिला. या पराभवातून फ्रान्स सावरू शकला नाही आणि साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला.

जर्मनी ७-१ ब्राझील (२०१४)

१९५० च्या विश्वचषक स्पर्धेत घरच्या मैदानावर उरुग्वेविरुद्ध अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी २०१४ चा विश्वचषक ब्राझीलसाठी सुवर्णसंधी मानला जात होता. सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात ब्राझील सहाव्यांदा विश्वविजेता बनणार, अशी संपूर्ण देशवासीयांची खात्री होती. जेतेपदासाठी त्यांना केवळ दोन सामने जिंकायचे होते.

उपांत्य फेरीत त्यांचा सामना जर्मनीशी होता. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास सारखाच राहिला होता. मात्र, उपांत्यपूर्व सामन्यात ब्राझीलचा स्टार फॉरवर्ड नेमार ज्युनियर दुखापतीमुळे आणि कर्णधार थियागो सिल्वा पिवळ्या कार्डमुळे या सामन्याला मुकले होते. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला जर्मनीने पहिला गोल केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. २३ व्या ते २९ व्या मिनिटाच्या दरम्यान, म्हणजे अवघ्या ६ मिनिटांत जर्मनीने तब्बल ४ गोल डागून मैदानातील खेळाडूंना, स्टेडियममधील प्रेक्षकांना आणि संपूर्ण ब्राझील देशाला स्तब्ध केले.

उत्तरार्धातही ब्राझीलची स्थिती सुधारली नाही, जर्मनीने आणखी दोन गोल केले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला ब्राझीलला केवळ एक गोल करता आला. ७-१ चा हा गोलफलक १९२० नंतरचा ब्राझीलचा सर्वात मोठा पराभव होता. या पराभवाला 'द ॲगोनी ऑफ मिनेइरावो' (मिनेइरावोची काळी रात्र) असे संबोधण्यात आले, जे या फुटबॉलप्रेमी देशासाठी एका राष्ट्रीय अपमानासारखे होते.

नेदरलँड्स ५-१ स्पेन (२०१४)

२०१४ च्या विश्वचषकातील 'ब' गटातील पहिल्याच सामन्यात २०१० च्या विश्वचषकातील दोन अंतिम स्पर्धक समोरासमोर आले होते. स्पेनचा संघ युरोपियन आणि जागतिक विजेता म्हणून या स्पर्धेत उतरला होता. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला झाबी अलोन्सोने गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली तेव्हा सर्व काही अपेक्षेनुसार सुरू होते. परंतु, मध्यंतराचा अवघा एक मिनिट शिल्लक असतान या स्पर्धेतील सर्वात अविस्मरणीय गोल पाहायला मिळाला.

गोलपोस्टपासून १५ यार्ड अंतरावर असलेल्या रॉबिन व्हॅन पर्सीने हवेत तरंगत येणाऱ्या चेंडूवर डायव्हिंग हेडर मारत एक अद्भूत गोल केला. स्पेनचा महान गोलरक्षक इकेर कॅसिलास याच्यासह संपूर्ण स्पॅनिश संघ हा गोल पाहतच राहिला. यानंतर डच संघाने स्पेनच्या बचावफळीची लक्तरे वेशीवर टांगली आणि गोलचा ‘चौकार’ लगावला. यासह स्पेनला ५-१ असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. विश्वचषकाच्या इतिहासात गतविजेत्या संघाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या धक्क्यातून स्पेनचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला, तर नेदरलँड्सने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

दक्षिण कोरिया २-० जर्मनी (२०१८)

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठे उलटफेर हे सहसा गतविजेत्यांच्या पराभवाशी संबंधित राहिले आहेत आणि २०१८ चा विश्वचषकही त्याला अपवाद नव्हता. सलग तिसऱ्या विश्वचषकात गतविजेता संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची ही वेळ होती. जर्मनीला पुढील फेरीत जाण्यासाठी साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य होते, तर दक्षिण कोरियाचा संघ स्पर्धेतून आधीच बाहेर पडल्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी खेळत होता.

सामना गोलशून्य बरोबरीकडे सरकत असताना, जर्मनीने विजयी गोल करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद आक्रमणात लावली. मात्र, इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या किम यंग-ग्वोनने कॉर्नरवरून गोल करत जर्मनीला सुन्न केले. यानंतर, जर्मनीचा कर्णधार आणि गोलरक्षक मॅन्युएल न्युएर आपल्या संघाच्या आक्रमणाला मदत करण्यासाठी गोलपोस्ट सोडून थेट द. कोरियाच्या हाफमध्ये आला. दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी न्युएरचा पास चुकवून चेंडूचा ताबा घेतला आणि रिकाम्या जाळ्यात चेंडू ढकलत जर्मनीच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

१९३८ नंतर पहिल्यांदाच जर्मनीला विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचा टप्पा पार करता आला नाही. तसेच विश्वचषकात आशियाई देशाविरुद्ध मिळालेला हा त्यांचा पहिलाच पराभव ठरला.

सौदी अरेबिया २-१ अर्जेंटिना (२०२२)

सलग ३६ सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा ऐतिहासिक पराक्रम नावावर असलेला अर्जेंटिनाचा संघ कतारमधील २०२२ च्या विश्वचषकात जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरला होता. अपेक्षेप्रमाणे या लॅटिन अमेरिकन संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सामन्याच्या अवघ्या १० व्या मिनिटाला महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पेनाल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात अर्जेंटिनाने आणखी दोन गोल डागले होते, परंतु 'ऑफसाइड'मुळे ते नाकारण्यात आले. मध्यंतराची शिट्टी वाजली तेव्हा अर्जेंटिना हा सामना सहज खिशात घालणार, असेच चित्र दिसत होते.

मात्र, उत्तरार्धात सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. ४८ व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या सालेह अल-शेहरीने एका लांबून आलेल्या पासवर अप्रतिम ताबा मिळवला आणि अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ याला चकवून चेंडू गोलजाळ्यात धाडला. यासह सौदीने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

या धक्क्यातून अर्जेंटिनाचा संघ सावरण्यापूर्वीच, अवघ्या पाच मिनिटांतच सौदीचा विंगर सालेम अल-दौसारीने डाव्या बाजूने चेंडू ड्रिबल करत गोलपोस्टच्या वरच्या कोपऱ्यातून एक अविस्मरणीय गोल डागला, ज्यामुळे सौदी अरेबियाची आघाडी दुप्पट झाली. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये अर्जेंटिनाने गोल बरोबरीसाठी केलेले सर्व आक्रमक प्रयत्न सौदीच्या अभेद्य बचावफळीने मोडीत काढून ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT