भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून (दि. 16) सुरुवात होणार आहे. File Photo
स्पोर्ट्स

बेंगळुरू कसोटीपूर्वी न्यूझीलंडला धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand Test Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारपासून (16 ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत खुलासा केला आहे. तसेच सियर्सच्या जागी जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, बेन सियर्सची दुखापत निराशाजनक आहे. त्याने घरच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होत्या. पण तो जायबंदी झाला आहे. त्यामुळे संघाचे नुकसान झाले आहे.

सियर्सच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर आहे. स्कॅन्सवरून याबाबत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर असल्याचे समजते आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या अधिकृत निवेदनात सियर्सबद्दल माहिती दिली आहे. यात म्हटलंय की, ‘भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सिअर्सला न खेळवण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला आहे. त्याच्या जागी जेकब डफीची निवड करण्यात आली आहे. तो बुधवारी भारताला रवाना होणार आहे. अशा स्थितीत तो पहिल्या कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.’

श्रीलंका दौऱ्यात सियर्सला गुडघेदुखीचा त्रास झाला होता. मायदेशी गेल्यानंतर त्याच्यावर उपचार झाले. दरम्यान याच कारणामुळे त्याला भारतात येण्यास विलंब झाला. तो येण्याच्या काही दिवस आधीच संपूर्ण संघ भारतात पोहचला होता. थोड्या दिवसांनी तो भारतात आला. पण दुखापतीने त्याची पाठ सोडली नाही. सरावादरम्यान सिअर्सला त्रास जाणवला. त्याने याची वैद्यकीय पथकाला माहिती दिली. यानंतर स्कॅनिंग आणि महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. ज्यात सिअर्सची दिखापत गंभीर असल्याचे समजले. ज्यामुळे त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, “बेन सीअर्स बाहेर पडल्याने आम्ही निराश झालो आहोत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केली. तो आमच्यासाठी वेगवान गोलंदाजीचा उत्तम पर्याय आहे. मात्र, तो किती दिवस बाहेर राहील हे निश्चित नाही, पण तो लवकरात लवकर बरा होईल अशी आशा आहे. त्याच वेळी, जेकब डफीसाठी देखील ही एक मोठी संधी आहे. डफीने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी सहा एकदिवसीय आणि 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु अद्याप त्याचे कसोटी पदार्पण झालेले नाही. तथापि, त्याच्याकडे 102 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे आणि त्याने लाल चेंडूने 299 बळी घेतले आहेत.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT