नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2026 च्या हंगामापूर्वी लखनौ सुपर जायंटस् (एलएसजी) संघात मोठ्या बदलांचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे लखनौ संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. या नियुक्तीमुळे त्यांचा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) सोबतचा चार वर्षांचा यशस्वी प्रवास संपुष्टात आला आहे.
यासोबतच, फिरकी गोलंदाजी मजबूत करण्यासाठी लखनौ संघाने इंग्लंडचे प्रसिद्ध प्रशिक्षक कार्ल क्रो यांनाही संघात आणण्याची तयारी केली आहे. कार्ल क्रो यांनी ‘केकेआर’साठी सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या फिरकीपटूंच्या शैलीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले होते.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे या गोलंदाजांच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली होती. लवकरच लखनौ फ्रँचायझीकडून याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
भरत अरुण यांची ओळख केवळ एक प्रशिक्षक म्हणून नाही, तर युवा वेगवान गोलंदाजांना शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवणारे मार्गदर्शक म्हणून आहे.
लखनौ संघात त्यांची भूमिका केवळ गोलंदाजी प्रशिक्षणापुरती मर्यादित राहणार नाही, तर वर्षभर युवा गोलंदाजांची निवड करणे आणि त्यांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
भारतीय संघासोबत काम करताना त्यांनी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारख्या गोलंदाजांना घडवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.