पुढारी ऑनलाईन : क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक मानल्या जाणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना उद्या (दि.८) दुबईत खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वी २००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला आपल्याला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. चाहत्यांना हा सामना हाय-व्होल्टेज होण्याची अपेक्षा आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले असताना आजी-माजी क्रिकेटपटू विजेतेपदाचा मान कोणत्या संघाला मिळणार, या प्रश्नावर आपलं मत व्यक्त करत आहेत. टीम इंडियाच माजी क्रिकेटपटू आर. अश्विन याचे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. जाणून घेवूया अश्विन नेमकं काय म्हणाला, याविषयी..
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे की, "मला भीती वाटतेय, न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना निराश करू शकतो. मला भारताच्या विजयाची आशा आहे, पण त्याला भीतीही वाटत आहे. २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या सलग तिसर्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने २०२३ च्या वन-डे विश्वचषक, ०२४ च्या टी-२० विश्वचषक आणि आता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. यावर अश्विनने म्हणतो की, एकाच मैदानावरील फायद्याबद्दल पत्रकार परिषदेत आमच्या कर्णधारांना, प्रशिक्षकांना विचारलेल्या प्रश्नांवर मी फक्त हसू शकतो. भारतीय क्रिकेट संघ परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेत खेळ केल्याने जिंकत आहे. २००९च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्व सामने एकाच ठिकाणी खेळले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या सामन्यात जिंकता आलं नाही ही आसीसीची चूक नाही. दर्जेदार क्रिकेट खेळल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, असेही अश्विनने स्पष्ट केले आहे.
'एक संघ भारतात येतो आणि ०-४ असा पराभव झाल्यानंतर खेळपट्टीला दोष देतो. आमच्या खेळाडूंवर चिखलफेक करण्यासाठी हे केले जाते. कृपया अशा गोष्टींमध्ये अडकू नका. काही भारतीय लोकही या वादात अडकत आहेत. मला यात एक समस्या आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने मिळवलेल्या विजयानंतर, मला वाटते की ते पुन्हा एकदा आपल्याला दुखवू शकतात, अशी भीतीही अश्विनने व्यक्त केली आहे.
नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन सारख्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघावर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, एकाच ठिकाणी खेळण्याचे वेळापत्रक आखल्याने भारताला फायदा होत आहे. संघ अजिबात प्रवास करत नाहीये आणि यामुळे त्यांना परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळाली आहे.
न्यूझीलंड संघाला त्यांचा शेवटचा ग्रुप अ सामना खेळण्यासाठी दुबईला यावे लागले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामना खेळण्यासाठी पाकिस्तानला परतावे लागले होते. यावर न्यूझीलंडच्या प्रशिक्षक स्टेड यांनी म्हटलं आहे की, हे एक धावपळीचे वेळापत्रक होते; परंतु त्याचा संघ अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम होता. भारताने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले. आम्हाला येथे एक सामना खेळण्याची संधी मिळाली. आम्हाला त्या अनुभवातून शिकायचे आहे. या टप्प्यावर पोहोचणे खूप रोमांचक आहे. हा सामना इतर कोणत्याही सामन्यासारखाच आहे. जर आपण रविवारी चांगला खेळ करून भारताला हरवू शकलो तर मला खूप आनंद होईल.