आयपीएलमधून बीसीसीआयची बंपर कमाई Pudhari File Photo
स्पोर्ट्स

आयपीएलमधून बीसीसीआयची बंपर कमाई

arun patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग ही बीसीसीआयसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. बीसीसीआयचे आणि भारतीय क्रिकेटचे सर्व अर्थकारण हे आयपीएलभोवती फिरते आहे. बीसीसीआयने आयपीएल 2023 मधून जवळपास 5,120 कोटी अतिरिक्त कमाई केली आहे.

2008 पासून सुरू झालेल्या या लीगने जगभरातील क्रिकेटपटूंना आकर्षित केले आणि जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग बनली आहे. आयपीएल लिलावात खेळाडूंवर कोटींची बोली लागलेली पाहायला मिळते. यावरूनच या लीगमधून फ्रँचायझी आणि बीसीसीआयला किती उत्पन्न मिळतेय याचा अंदाज लावता येईल.

आयपीएल 2022 च्या तुलनेत 116 टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे समोर येत आहे. आयपीएल 2023 मधून बीसीसीआयची एकूण कमाई 78 टक्के जास्त झाली असून, हा आकडा 11,769 कोटींपर्यंत गेला आहे; पण त्याचबरोबर बीसीसीआयच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालानुसार, एकूण खर्च 66 टक्के वाढून 6,648 कोटी झाला असल्याचे समोर आले आहे.

नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व सौद्यांमुळे ही वाढ झाली. 2023-27 या कालावधीसाठी बीसीसीआयसोबत 48,390 कोटींचा मीडिया हक्क करार झाला आणि आयपीएल 2023 सीझनसह याची सुरुवात झाली. 2021 मध्ये डिस्ने स्टारने 2023-27 या कालावधीसाठी आयपीएलचे टी.व्ही. राईटस् जिंकले. त्यांनी यासाठी 23,575 कोटींची यशस्वी बोली लावली. तेच दुसरीकडे व्हायोकॉम 18 च्या जिओ सिनेमाने डिजिटल हक्कांसाठी 23,758 कोटी रुपये मोजले.

बीसीसीआयने आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप टाटा सन्सला 2,500 कोटींना पाच वर्षांसाठी विकली आहे. याशिवाय माय सर्कल 11, रूपे, एंजल वन आणि सिएट यासह इतर को-स्पॉन्सरकडून 1,485 कोटींची कमाई बीसीसीआयला होते. वार्षिक अहवालानुसार, बीसीसीआयचे मीडिया हक्कांचे उत्पन्न आयपीएल 2022 च्या तुलनेत (3,780 कोटी) आयपीएल 2023 मध्ये 131 टक्क्यांनी वाढून ते 8,744 कोटी झाले आहे.

फ्रँचायझी फीमधून होणारी कमाई 1,730 कोटींवरून 2,117 कोटी झाली आहे. प्रायोजकत्वातून येणारा महसूल 874 कोटी झाला. मागील पर्वात तो 828 कोटी होता आणि आयपीएल 2023 मध्ये त्यात 2 टक्के वाढ झाली. आयपीएल 2018 ते 2022 या कालावधीत डिस्ने स्टारकडे आयपीएलचे मीडिया हक्क होते आणि त्यांनी पाच वर्षांसाठी बीसीसीआयला 16,347 कोटी रुपये दिले होते.

बँक बॅलन्स अन् जीएसटी

बीसीसीआयकडे आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस विविध बचत व चालू खाती आणि मुदत ठेवीच्या स्वरूपात एकूण 16,493.2 कोटी बँक बॅलन्स होता, ही रक्कम गेल्यावर्षी 10,991.29 कोटी इतकी होती. 2023 च्या सीझनमध्ये सेंट्रल पूलमधून आयपीएल फ्रँचायझींना 4,670 कोटी दिले. बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 2038 कोटींचा जीएसटी भरला असल्याची माहिती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT