नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटमधील अफाट क्षमतेचे आता प्रत्यक्ष यशामध्ये रूपांतर होताना दिसत आहे, अशा शब्दांत माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटच्या सद्यस्थितीवर समाधान व्यक्त केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नमन पुरस्कार सोहळा रविवारी (दि.15) राजधानी दिल्लीत उत्साहात पार पडला. यावेळी राहुल द्रविड यांच्यासह माजी मध्यमगती गोलंदाज रॉजर बिन्नी, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासह विविध दिग्गज क्रिकेटपटूंचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटच्या यशावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटमध्ये टॅलेंटची कधीच कमतरता नव्हती, पण आता त्या टॅलेंटचे रूपांतर मोठ्या विजयांमध्ये होताना पाहणे खरोखरच समाधानकारक आहे. हे सर्व आता अगदी योग्य दिशेने चालल्यासारखे वाटते.’
द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले असून, त्यांनी युवा खेळाडूंना घडवण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय क्रिकेटची ही घोडदौड आगामी काळातही अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय क्रिकेट आता जगावर राज्य करणार ः संजू सॅमसन
भारतीय क्रिकेटमध्ये आता अशा विजयांची मालिका वारंवार पाहायला मिळेल आणि आगामी अनेक वर्षे भारत जागतिक क्रिकेटवर राज्य करेल, असा ठाम विश्वास भारतीय स्टार फलंदाज संजू सॅमसन याने व्यक्त केला आहे. सॅमसनने रविवारी राजधानी दिल्लीत बीसीसीआयच्या नमन पुरस्कार 2026 च्या सोहळ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘भारतीय संघाने ज्याप्रकारे हा विश्वचषक जिंकला, ते केवळ एक यश नसून भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वाची ती सुरुवात आहे. भारताने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपली पकड मजबूत करत
बीसीसीआय नमन पुरस्काराने गौरवलेले दिग्गज असे :
पुरस्काराचे नाव विजेत्याचे नाव
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू (पुरुष) शुभमन गिल
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू (महिला) स्मृती मानधना
जीवनगौरव पुरस्कार (पुरुष) रॉजर बिन्नी, राहुल द्रविड
जीवनगौरव पुरस्कार (महिला) मिताली राज
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष) हर्षित राणा
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला) एन. श्री चरणी
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी (महिला) दीप्ती शर्मा
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ मुंबई क्रिकेट असोसिएशन
रणजी ट्रॉफी सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे (विदर्भ)
लाला अमरनाथ पुरस्कार आयुष म्हात्रे (मुंबई)
सर्वोत्तम पंच (घरगुती क्रिकेट) उल्हास गंधे (विदर्भ)
इतर महत्त्वाचे पुरस्कार : कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी : सर्वाधिक बळी - विक्की ओस्तवाल (महाराष्ट्र). रणजी ट्रॉफी : सर्वाधिक धावा - वाय. व्ही. राठोड (विदर्भ); सर्वाधिक बळी - हर्ष दुबे (विदर्भ). जगमोहन दालमिया ट्रॉफी (कनिष्ठ महिला): ईरा जाधव (मुंबई).