जयपूर; वृत्तसंस्था : वन डे व टी-20 क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कामगिरी प्रभावी राहिली; त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी एक आयसीसी आणि एसीसी ट्रॉफी जिंकली. मात्र, याचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये ‘सेना’ (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध 10 पराभव पत्करावे लागल्याने त्याची कसोटीतील कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर, बीसीसीआय कसोटी क्रिकेटसाठी नव्या प्रशिक्षकपदाच्या शोधात असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर क्रिकेट बोर्डातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तीने व्हीव्हीएस लक्ष्मणकडे पुन्हा एकदा संपर्क साधला आणि गंभीरच्या जागी कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास लक्ष्मण इच्छुक आहे का, याची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, लक्ष्मण यासाठी फारसा उत्सुक नसल्याचे समजते.
गंभीरचा बीसीसीआयसोबतचा करार 2027 च्या वन डे विश्वचषकापर्यंत असला तरी, पुढील 5 आठवड्यांत सुरू होणार्या टी-20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीवर त्यांचा करार अवलंबून असेल. आवश्यकता भासल्यास या करारावर फेरविचार होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या वर्तुळात गंभीर 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या उर्वरित 9 कसोटी सामन्यांसाठी कसोटी संघाचा प्रशिक्षक म्हणून योग्य व्यक्ती आहे की नाही, यावर अद्याप एकमत झालेले नाही.
लक्ष्मणला वरिष्ठ कसोटी संघाचे प्रशिक्षण घेण्यात रस नसल्यामुळे गंभीरला पर्याय उपलब्ध नाहीत, हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे, असेही सूत्राने यावेळी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयमध्ये पाठिंबा मिळत असला तरी आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पुढील 2 महिने ‘गुरू गंभीर’साठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, हे स्पष्ट आहे.