पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी आणि या मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममधील काही गोष्टी समोर आल्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी कारवाई केली. बीसीसीआयने कामगिरीच्या आधारे अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांना सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हटवले आहे. याव्यतिरिक्त, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. जूनमधील इंग्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने हा मोठा बदल केला आहे.
बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा करार रद्द केला आहे. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत बीसीसीआयने त्यांना हटवले.
दुबईमध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही अवघ्या आठ महिन्यांच्या कार्यकाळातच बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना बाहेरचा रस्ता दाखवला. संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने बीसीसीआयकडे 'ड्रेसिंग रूम लीक्स'बद्दल तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेण्यात आली.
गेल्या वर्षी जुलैमध्ये नायर यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या अखेरीस कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी बीसीसीआयने घेतलेल्या आढाव्यानंतर नायर यांनी सपोर्ट स्टाफ टीममधून हटण्यात आले. भारताचा गेल्या वर्षीच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३-० असा पराभव झाला होता. त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ अशी निराशाजनक कामगिरी राहिली होती.
दरम्यान, पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, २०२४-२५ हंगामात सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य आणि एका वरिष्ठ स्टार खेळाडूमधील वादात अभिषेक नायर बळीचा बकरा ठरला आहे.