IPL Team Secrets Leak: IPL 2026 चा हंगाम रंगात आला असतानाच आता मैदानाबाहेरील एका नव्या वादाने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. एका स्टार क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडने संघाशी संबंधित गोपनीय माहिती बाहेरच्या लोकांना लीक केल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकरणानंतर BCCI ने तातडीने सर्व फ्रेंचायझींना कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
BCCI ने 7 मे रोजी IPL मधील सर्व 10 फ्रेंचायझींना तब्बल 8 पानी गाइडलाइन्स पाठवल्या आहेत. यात सुरक्षा नियम, प्रोटोकॉल आणि खेळाडूंच्या खासगी हालचालींबाबत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा टीम मालकांच्या पाहुण्यांना आता लिखित परवानगीशिवाय टीम हॉटेलमधील खोल्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही.
या अचानक घेतलेल्या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर एका मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा करण्यात आला. IPL मध्ये खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड दोन वेळा संघातील गोपनीय माहिती बाहेरील लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचे कथितरित्या आढळून आले. ही बाब संबंधित फ्रेंचायझीच्या लक्षात आल्यानंतर तातडीने BCCI ला माहिती देण्यात आली.
यामुळेच BCCI आता पूर्णपणे सतर्क झाली आहे. बोर्डाच्या अँटी करप्शन युनिटलाही काही प्रोटोकॉल उल्लंघनाच्या तक्रारी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या गाइडलाइनमध्ये ‘हनी-ट्रॅप’सारख्या धोक्यांबाबतही स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. खेळाडूंना अशा प्रकारच्या जाळ्यात अडकू न देण्यासाठी फ्रेंचायझींना सांगण्यात आले आहे. विशेषतः सोशल सर्कल, पार्टनर, मित्र किंवा बाहेरील व्यक्तींमार्फत संघातील रणनीती, प्लेइंग इलेव्हन किंवा ड्रेसिंग रूममधील चर्चा बाहेर जाणार नाहीत, यावर भर देण्यात आला आहे.
IPL सारख्या अब्जावधींच्या लीगमध्ये बेटिंग, स्पॉट फिक्सिंग आणि माहिती लीक होण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे BCCI यावेळी कोणतीही जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही. आता पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.