Women's World Cup : आज आपल्याकडे महिला आणि मैदानी खेळ हे चित्र बर्यापैकीदिसत असले तरी, काही वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. महिलांनी खेळासाठी मैदानावर उतरणे हीच मोठी गोष्ट मानली जायची. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवणे तर दूरच!मात्र, मागील काही वर्षांमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी विविध खेळांमध्ये अतुलनीय कामगिरी करत हे चित्र बदलून टाकले आहे. या सर्व संघर्षाचे आणि यशाचे स्मरण होण्याचे निमित्त दोन गोष्टी घडल्या.पहिली रविवारी (दि. २) भारतीय महिला क्रिकेट संघाने वन- डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तर दुसरी या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी महिला क्रिकेटपटूंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
भारतायी महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांना सांगितले होते की, श्रीनिवासन यांनी बीसीसीआयची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आम्ही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेलो होतो. यावेळी श्रीनिवासन म्हणाले होते की, 'जर माझे मर्जी असते तर मी महिला क्रिकेट होऊ दिले नसते. मला महिला क्रिकेटचा तिरस्कार आहे.' डायना यांनी असेही म्हटलं होतं की, २००६ मध्ये महिला क्रिकेट बीसीसीआयच्या ताब्यात गेली. त्यावेळीपासून मी नेहमीच बीसीसीआयचा कट्टर विरोधक आहे. कारण बीसीसीआय ही पुरुषप्रधान संघटना आहे. त्यांना कधीही महिलांनी या क्षेत्रात निर्णय घ्यावेत, असे वाटत नव्हते."
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.सलामीवीर वर्मा हिने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. भारताने नाणेफेक गमावल्यानंतर ५० षटकांत ७ बाद २९८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिची शतकी झूंज व्यर्थ ठरली.
टीम इंडियाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने रविवारी संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली," मला वाटते की, टीका ही जीवनातील मुख्य गोष्टींपैकी एक आहे. सर्वकाही चांगले असावे याची आवश्यकता नसते. टीका होणे ही तुम्हाला संतुलित करते. अन्यथा, जर सर्वकाही चांगले झाले तर तुम्ही अतिआत्मविश्वासू व्हाल. टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही, कारण आपण कधी काहीतरी बरोबर करत नाही हे आपल्याला माहिती असते."